पाणी अंगावर उडण्याच्या भीतीने चालणे मुश्किल
| नेरळ | प्रतिनिधी |
पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून बनविण्यात आलेल्या ओलमन कोतवाल वाडी चई नांदगाव रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरील चई गावात असलेला रस्ता रस्त्यातून वाहणार्या पाण्यामुळे खड्डेमय बनला आहे. या रस्त्यातून पावसाळ्यासारखे पाणी वाहत असून स्थानिकांना चालणे कठीण होऊन बसले आहे. दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून खड्डेमुक्त रस्त्यांची कार्यवाही कधी होणार, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ओलमन ग्रामपंचायतीमधील चई गावामधून जाणारा ओलमन नांदगाव रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरील चई गावाबाहेरील रस्त्यावर सतत खड्डे निर्माण झालेले असतात. हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आला होता आणि त्यानंतरच्या काळात अखंड असा एकदाही बनविला गेलेला नाही.वेगवेगळ्या भागात कामे करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे ओलमन पासून नांदगावपर्यंत या रस्त्यावर खड्डे आहेत. त्यात नांदगाव गावापासून विठ्ठलवाडी फाटा या भागात तर रस्ता मातीमध्ये हरवला असून त्या ठिकाणी रस्ता डांबरी होता काय? हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. तर चई गावामधील जिल्हा परिषदेची शाळा आणि पुढे हा रस्ता सध्याच्या कडक उन्हाळ्यातदेखील पाण्याच्या डबक्यात हरवला आहे. रस्त्यात पावसाळा असल्यागत स्थिती झाली असून बांधकाम खात्याचे अधिकारी रस्ते पाहण्यासाठी फिरत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना त्या रस्त्याने चालत जाताना अंगावर चिखल किंवा पाणी उडण्याच्या भीतीने ग्रासले आहे.
चई गावातील ग्रामस्थांनी अनेकदा रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून वाहणारे पाणी तसेच, निर्माण झालेले डबके यामुळे रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे पाहण्यासाठी यावे, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी केली आहे.