दोन डोस घेऊनही तिकीट मिळेना
पास काढण्याची होतेय सक्ती
नेरळ | वार्ताहर |
उपनगरीय लोकल प्रवास हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बंद करण्यात आला होता. पण, ज्यांना दोन डोस मिळाले आहेत, त्यांना सिजनल तिकीट देण्यात येत असून, त्या प्रवाशांना कोणताही सिंगल अथवा रिटर्न तिकीट मिळणार नाही, असे परिपत्रक रेल्वेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात कमालीची नाराजी आहे.
सर्व रेल्वे स्थानकांवर त्याप्रमाणे बोर्ड लावण्यात आले असून, ज्या प्रवाशांना आपल्या एखाद्या कामासाठी प्रवास करायचा असल्यास, त्यांना तो प्रवास करणे शक्य होत नाही.सिंगल तिकीट मिळणार नाही, त्याऐवजी पास काढा, असे रेल्वेकडून सांगण्यात येत असल्याने काही कामासाठी बाहेर प्रवास करणार्या प्रवाशांना त्या पासचा काय उपयोग? त्यांनी आपले जादाचे पैसे का वाया घालवावे? अगोदरच मेटाकुटीला आलेल्या जनतेला आणखी हे सरकार किती लुबाडणार? असा संतप्त सवाल प्रवासी करताना दिसत आहेत. वाढलेल्या महागाईचा फटका जनसामान्यांना बसत असतानाच या जुलमी निर्णयाने प्रवासी वर्गात कमालीचा संताप आहे.
गरज नसताना पास का घ्यावा?
28 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील तसेच सर्वसामान्य प्रवाशांना या निर्णयाचा नाहक त्रास होत आहे. साधारण 20 रुपयांत मिळणारे तिकीट घेण्याऐवजी 225 रुपयांचा पास गरज नसताना का घ्यावा? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. लसीकरण झालेले असून, इतर सर्व गोष्टी सुरळीत चालू झालेल्या असताना, तिकिटांसाठी अडवणूक कशाला?
किशोर गायकवाड, अध्यक्ष, भिवपुरी रोड प्रवासी संघटना