मंडळांनी खोदले रस्ते, खड्ड्यांमध्ये अधिक पडली भर

| पनवेल | वार्ताहर |

पावसाळ्यात पनवेल शहरासह सिडको वसाहतींमधील बहुतेक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यांवर मंडपासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात नवरात्रोत्सवाची भर पडणार असून, वसाहतींमधील सुस्थितीतील रस्त्यांवर मंडळांनी खड्डे खोदण्यास सुरुवात केल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडणार आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मुंबई शहराप्रमाणे पनवेल शहरातही नवरात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, शहरासह वसाहतींमधील काही रस्त्यांचा अर्धा भाग नवरात्रोत्सव मंडळांनी विद्युत रोषणाई व बॅनर उभारण्यासाठी व्यापला आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, उत्सवकाळात मंडळांसाठी महापालिकेने मंडप उभारणीबाबत नियमावली तयार केली आहे. डांबरी व सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे खोदू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी खड्डे व्यवस्थित बुजवावेत, असे स्पष्ट केले आहे. मात्र, असे असताना शहरातील मध्यवर्ती भागांसह उपनगरात गणेशोत्सव काळात खोदलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून वाट काढतच जावे लागणार असल्याची परिस्थिती आहे. या संदर्भात पनवेल पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version