जिल्हा रुग्णालयाची स्वच्छता रामभरोसे

। अलिबाग । प्रतिनिधी ।
चांगले आरोग्य ठेवण्यासाठी वारंवार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सल्ला देणार्‍या जिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा दुरुस्तीचा प्रश्‍न गंभीर असतानाच रुग्णालयाच्या स्वच्छतेबाबत प्रशासन उदासिन ठरत आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. ठिकठिकाणी गवत झुडपांनी रुग्णालयाच्या इमारतीला विळखा घातला आहे . कोट्यावधी रुपये खर्च करून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न असतानाही ही स्वच्छता वार्‍यावर रामभरोसे असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी अलिबाग या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय उभारले आहे. या 38 वर्ष जुनी असलेल्या या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. वारंवार इमारतीची डागडूजी करून देखील इमारतीची अवस्था दयनीय आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय सुमारे 250 खाटांचे आहे. दर दिवशी या रुग्णालयात पाचशेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. यातील काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागते. तर काही रुग्णांना प्राथमिक उपचार करून परत पाठविले जाते. रुग्णालयामध्ये अपघातात जखमी झालेले व अन्य आजाराचे रुग्ण सतत येतात.

अपुरी यंत्रणा असल्याने रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईत हालविण्याची वेळ येत आहे. तसेच रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सांडपाण्याच्या पाईपला गळती लागल्याने ते रस्त्यावर पसरले आहे. रुग्णांना भेटण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांना नाक दाबून रुग्णालयात यावे लागत आहे. रुग्णालयाच्या बाजुला लहान मुलांवर उपचार कऱण्यासाठी सुसज्ज असे केंद्र आहे. मात्र या केंद्राच्या इमारतीला गवत, झुडपांनी विळखा घातला आहे. रुग्ण असलेल्या लहान मुलांना आपत्कालीन परिस्थितीत ने – आण करण्यासाठी योग्य असा मार्ग नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीला संपुर्ण झाडा झुडपांनी विळखा घातला आहे. मोठ मोठी झाडे इमारतीवर उगविली आहेत. रुग्णालयाच्या बाहेर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहाची अवस्थाही दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रुग्णालयात व परिसराच्या स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. परंतू प्रत्यक्षात स्वच्छतेच्याबाबतीत जिल्हा सामान्य रुग्णालय रामभरोसे आहे.

Exit mobile version