| चिरनेर | प्रतिनिधी |
पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे यासह सर्व साहित्याच्या वाचनाची गोडी मराठी समाजाला लागावी, यासाठी अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यात वाचन चळवळ राबविली पाहिजे. यासाठी छोटे मोठे लेखक, पत्रकार, संपादक यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात कुशल वाचकांची संख्या वाढविण्यासाठी पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तरच महाराष्ट्रात विविध प्रकारची पुस्तके, वर्तमानपत्रे वाचणाऱ्या वाचकांची संख्या वाढेल, असे मत महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबईचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाबुराव माने यांनी व्यक्त केले आहे.
सातारा नगरीत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली. या पार्श्वभूमीवर बाबुराव माने यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना लिहिलेल्या खुल्या पत्रातून माने यांनी ही मागणी केली आहे. बाबुराव माने म्हणाले की, आज आपल्या ज्ञानशक्तीचा पाया अत्यंत भुसभुशीत आहे. ज्ञानशक्ती ही वाचनाने समृध्द होते. परंतु, आज एखाद्या शाळेत डोकावले तर अनेक शाळांत अनेक विद्यार्थ्यांना वाचावे कसे हे माहितच नाही. वाचन हे मनातले असो किंवा मोठ्या आवाजात एका लयीत केलेले वाचन असो. असे वाचन करणारे विद्यार्थी आणि अशा वाचनाचे धडे देणारे शिक्षक आपल्याला फार कमी दिसत आहेत. यासाठी वाचन चळवळ साहित्यिक, पत्रकार आणि संपादकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविली गेली तर नक्कीच या चळवळीस चांगले यश येईल. यासाठी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी छोटे मोठे लेखक, कवी इतर क्षेत्रातील तज्ज्ञांना बरोबर घेतल्यास महाराष्ट्रात नक्कीच वाचन चळवळ समृध्द होईल, असे मत त्यांनी मांडले.







