उरणचे उपजिल्हा रुग्णालय कागदावरच

| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणारे उपजिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने गेल्या दहा वर्षांपासून कागदावरच राहिले असल्याने उरणच्या जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

उरण येथे आरोग्याच्या दृष्टीने एक सुसज्ज रुग्णालय असावे, अशी मागणी येथील जनता तसेच उरण सामाजिक संस्थेने 2010 पासून लावून धरली आहे. यासाठी विविध पक्षाच्या नेत्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने 2011 मध्ये उपजिल्हा रुगणालय उभारण्याची घोषणा सरकारने केली. त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून उरण-पनवेल मार्गावरील वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहतीशेजारी भूखंडही मंजूर करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रथम पाच कोटी त्यानंतर 57 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. तरीही उरणमध्ये रुग्णालयाच्या उभारणीस सुरुवात झालेली नाही.

मागील वर्षी पालकमंत्राच्या दरबारात 100 खाटांच्या रुग्णालयाचा मुद्दा उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उपस्थित केला आणि पालकमंत्रांनी सर्व विभागांना त्वरित पाहणी करण्याचे आदेशही दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून संबंधित विभागाने पाहणीही केली. मात्र, एक वर्षानंतरही कोणतीच कारवाई होताना दिसली नसल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

उरण ध्ये केंद्र शासनाचे विविध प्रकल्प आहेत. जेएनपीए बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पावर आधारित अनेक प्रकल्प आहेत. उरण तालुका हा राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा तालुका असतानाही येथील जनतेला उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई व पनवेल येथे जावे लागत आहे. उरणमधील रुग्णांना 20 ते 30 किलोमीटरवरचे अंतर पार करीत असताना वेळीच उपचार न झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथील अनेक प्रकल्पांचा सीएसआर फंड हा बाहेर राज्यात वापरला जात आहे. मात्र येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी हा निधी वापरला जात नाही, ही खंत व्यक्त केली जात आहे. तरी उरण परिसरातील कंपन्यांनी आपला सीएसआर फंड दिला असता तर अनेक युवकांचे प्राण वाचले असते.

उरण येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने भूखंड सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केला आहे. परंतु जे 100 खाटांचे रुग्णालय बांधायचे आहे. ज्या ज्या गोष्टी रूग्णालयात हव्या आहेत, त्या अनुषंगाने रुग्णालयासाठी ही जागा अपुरी पडत आहे. कारण बाजूने सीआरझेड लाईन आहे. त्यामुळे 50 मीटर अंतर सोडावे लागत आहे. जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा आरोग्य विभाग आणि डेप्युटी आरोग्य विभाग ठाणे येथे प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्याकडून काही रिप्लाय आलेला नाही.

नरेश पवार, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण

Exit mobile version