आदिवासींची गैरसोय थांबणार
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायतीमधील वाल्मिकीनगर येथे असलेले सार्वजनिक शौचालाय स्थानिक व्यक्तीच्या मागणीनंतर दि.3 फेब्रुवारी 2022 रोजी तोडले होते. शौचालय तोडल्यानंतर स्थानिक आदिवासी वस्तीमधील लोकांना प्रातर्विधीसाठी बाहेर जावे लागत आहे. आदिवासी लोकांच्या मागणीनंतर नेरळ ग्रामपंचायतीने या शौचालयाचे बांधकाम सुरु केले होते. दरम्यान, आता त्या सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण होत आले असून, त्यामुळे आदिवासी लोकांची प्रातर्विधीसाठी बाहेर जाण्याची वेळ थांबणार आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीने तोडले होते. ग्रामस्थांसाठी पर्यायी व्यवस्था न करता आदिवासी लोकांसाठी आरक्षित असलेल्या वाल्मिकीनगरमधील एका बिगर आदिवासी व्यक्तीने अर्ज करून तोडण्याची मागणी केली होती. त्या वर्गावर ग्रामसभेत चर्चा झाली आणि त्यानंतर ते सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले, असा दावा नेरळ ग्रामपंचायतीने केला आहे. मात्र, त्या भागातील 200 हून अधिक कुटुंब त्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत होते. नेरळ ग्रामपंचायतीने ते सार्वजनिक शौचालय तोडताना स्थानिकांची पर्यायी व्यवस्था केली नाही. नेरळ ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी 15 वित्त आयोगाच्या निधीमधून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरु केले आहे. स्थानिक महिलांची गैरसोय होणार यांची कल्पना असतानादेखील ग्रामपंचायतने तेथील सार्वजनिक शौचालय तोडले होते. त्यामुळे आता ग्रामपंचायतीकडून नाहक खर्च करीत नवीन शौचालय बांधण्याचे काम सुरु केले होते.
आता या चार बेडच्या सार्वजनिक शौचालयचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिन्यात बांधकाम पूर्ण होऊन ते वापरास दिले जाऊ शकते. मात्र, आदिवासी लोकांची गैरसोय करणार्या ग्रामपंचायतीच्या धोरणाचे आणि आदिवासी लोकांची गैरसोय दूर होणार असून, नाहक खर्च जनतेच्या माथी टाकणार्या प्रशासनाविरुद्ध नाराजी कायम आहे.
शौचालायची निर्मिती अंतिम टप्प्यात
