अतुल गुळवणी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (15 नोव्हेंबर) वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अन सत्तर वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देश,विदेशातही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल इतिहास आणि शौर्य घरोघरी पोहोचविणार्या कृतार्थ जीवन जगणार्या शिलेदाराचा अखेऱ अंत झाला. बाबासाहेब खरोखरच कृतार्थ जीवन जगले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा श्वास अन ध्यासही होता.त्या युगपुरुषाने निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची कीर्ती भावी पिढीला समजावी,उमजावी यासाठी बाबासाहेबांसारख्या झपाटलेल्या एकांड्या शिलेदाराने जीवाचे रान केले.प्रसंगी टीका टिपणीही सहन केली.पण नेमस्त स्वभावाप्रमाणे बाबासाहेब हे शिवशाही जागृत ठेवण्यासाठी अहोरात्र झटतच राहिले.त्यांच्यासारखे इतिहासकार या भूमीत जन्मले म्हणून आजही शिवाजी महाराज यांच्याविषयी तमाम महाराष्ट्रीय जनतेला अभिमान वाटतोय.ज्या गड, किल्ल्यांवरुन शिवाजी महाराज यांची हिंदवी स्वराज्य निर्माण केले.त्या अबोल गडकिल्ल्यांना बोलके करण्याचे काम शिवशाहिरांसारख्या शिलेदाराने सार्या हयातीत केले.त्यामुळे आजही ते गडकिल्ल्यांवर केवळ अवशेष राहिले असले तरी बाबासाहेबांसारख्या अमोघ वाणीच्या वक्त्याने त्या अबोल गडकिल्ल्यांना देखील बोलके करुन शिवशाहीचा इतिहास जागृत ठेवण्याचे महान कार्य केले आहे.त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे देश, विदेशातही प्रचंड लोकप्रिय आणि समाजप्रिय होते. पण त्याचा त्यांनी कधीही अहंकार केला नाही.उलट साधी राहणी आणि उच्च विचारसरणी उराशी बाळगुन बाबासाहेब अखेरपर्यंत साधे जीवनच जगले.बाबासाहेब जसे वक्ते म्हणून लोकप्रिय होते तसेच ते समाजाभिमुखही होते.वक्तशीरपणा त्यांच्या नसानसात भिणला होता.एखादा कार्यक्रम पूर्वनियोजित वेळेतच सुरु करण्यात आणि नियोजित वेळेतच संपविम्यात त्यांचा खाक्या असे त्यामुळे बाबासाहेबांचे व्याख्यान असले की श्रोतेही नियोजित वेळेतच कार्यक्रमस्थळी उपस्थित रहात.त्यांच्या कार्यक्रमात कधीही हुल्लडबाजी झाली आहे असे कधीच घडले नाही.उलट हजारो श्रोते एकाग्र चित्ताने त्यांचे शिवशाहीवरील व्याख्याने श्रवण करीत असतं.अगदी टाचणी पडली तरी आवाज होईल,अशी शांतता बाबासाहेबांच्या व्याख्यानाच्यावेळी जाणवत असे.बाबासाहेबही अनेकदा प्रश्नोत्तराच्या रुपाने समोरच्या श्रोत्यांशी संवाद साधत.त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढे.अशी हजारो व्याख्याने बाबासाहेबांनी आपल्या हयातीत अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात दिली आणि युगपुरुष शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास जिवंत ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.राजा शिवछत्रपती या ग्रंथांची निर्मिती करुन त्यांनी शिवचरित्र घरोघरीच पोहोचविले.ते चरित्र लिहितांना त्यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमीच सादर केल्याने त्याचे वाचन करताना अंगावर रोमांच आल्याशिवाय रहात नाही.असाच प्रकार जाणता राजा हे महानाट्य पहाताना होते.शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे महानाट्य जसेच्या तसे नाट्यरुपात सादर करण्याची किमया फक्त बाबासाहेब पुरंदरे यांनीच करुन दाखविली.अगदी मैदानात हत्ती,घोडे,उंट आणून लढाईचा प्रसंग सादर करण्याचे कौशल्य फक्त शिवशाहीरच करु शकले.पण त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रीयन जनतेला,भावी पिढीला शिवप्रभुंचा जाज्वल इतिहास डोळे भरुन पहाता आला.आजही हे महानाट्य प्रचंड हाऊसफुल्ल होते.हे सारे बाबासाहेबांचेच श्रेय म्हटले पाहिजे.
बाबासाहेबांना दोनदा प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला.महाविद्यालयीन जीवनात पुरंदरे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखाना येथे शिवशाहीवरील सात दिवस व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.त्यामुळे त्यांचा मुक्काम कारखान्यावरील विश्रामगृहात होता.हे औचित्य साधून राशिवडे बुद्रुक येथील माझ्या गावातील फ्रेन्डस मित्र मंडळाने त्यांना गावात आणण्याचे ठरविले.त्यासाठी माझ्यासह अभय केळकर,सुधाकर कानकेकर आदी त्यांना भेटावयास गेलो.त्यासाठी गावातीलच एका नवोदित चित्रकाराकडून ऐतिहासिक स्वरुपात निमंत्रण पत्रिकाही खास तयार करुन घेतली होती.अर्थात ही कल्पना अभय केळकर याची होती.ती पत्रिका पाहून बाबासाहेब देखील आनंदित झआले आणि त्यांनी गावात येण्याचे निमंत्रण स्वीकारले.त्यानिमित्त गावात रक्तदान शिबीरही घेण्यात आले.कार्यक्रमासाठी बाबासाहेब तासभर उपस्थित होते.पण त्यांच्यासमवेत प्रवास करण्याचा योग मला लाभला.असाच दुसरा प्रसंग पुढारीत खासियत या सदरासाठी त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला.त्यावेळीही ते भोगावती कारखाना येथेच व्याख्यानमालेसाठी आलेले होते.दोन्ही वेळाही बाबासाहेबांसमवेत मनमोकळेपणे बोलता आले.एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाचा सहवास लाभला हे माझे भाग्यच समजतो.
बाबासाहेब खर्या अर्थाने आनंदी जीवन जगले.कृतार्थचेचे भाव त्यांच्या चेहर्यावर अखेरच्या क्षणापर्यंत होते.अगदी अलिकडेच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना त्यांनीही मी खर्या अर्थाने आनंदी आहे,पुनर्जन्म आहे की नाही मला माहित नाही.पण जे काय जीवन लाभले ते खरोखरच आनंद देणारे होते.द्वेष न करता प्रेम करीत रहा,असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.आज शिवाजी महाराज हयात नाहीत पण त्यांनी निर्माण केलेले गड,किल्ले पाहिले की आपोआपच त्या युगपुरुषाचे स्मरण होतेच.त्याचप्रमाणे त्या गड किल्ल्यांना बोलके करणार्या बाबासाहेब पुरंदेर नामक शिलेदारालाही महाराष्ट्र कदापि विसरणार नाही.बाबासाहेबांना अखेरचा मुजरा.भावपूर्ण आदरांजली.