कचर्याचे पिंजरे पडलेत अडगळीत; लाखो रुपयांचा खर्च वाया
| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीमधील कचर्याचे योग्य संकलन करण्यासाठी बनविलेले पिंजरे कुचकामी ठरले आहेत. नागरिक या पिंजर्यात कचरा टाकत नसल्याने, हे कचरा पिंजरे धूळखात अडगळीत पडले आहेत. पर्यायाने या पिंजर्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीनी खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये कचर्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील अनेक गावांमध्ये कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन नसल्याने गावातील अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो, त्यामुळे उरणला बकालतेचे स्वरूप आले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या आदेशाने गावातील सुका व ओला कचरा यांचे संकलन करून कचरा एका जागेत जमा व्हावा या उद्देशाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोखंडी जाळीचे पिंजरे बनविणे सक्तीचे आहे. या आदेशाची अंमलबजावणी करीत तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींनी आपल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने असे पिंजरे बनवून एका पिंजर्यात ओला, तर दुसर्या पिंजर्यात सुका कचरा टाकण्याच्या सूचना जनतेला दिल्या. मात्र, ग्रामपंचायतीच्या या आदेशाला जनतेने केरात टाकून, कचरा संकलनाकडे दुर्लक्ष केले.
अनेक ग्रामपंचायतीकडे कचरा वाहून नेणार्या गाड्या नसल्याने आजही अनेक गावात कचरा सार्वजनिक जागेवर किंवा रस्त्याच्या कडेला दिसून येत आहे. त्यामुळे अशा जागांचे डम्पिंग ग्राऊंड बनलेले दिसते. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत लोखंडी जाळीचे पिंजरे बनवून, कचर्याची साठवण व त्याची विल्हेवाट लावण्याची चांगली योजना असताना, ती फसल्याने या पिंजर्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे.







