| आगरदांडा | वार्ताहर |
श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने मुरुड शहरात अक्षता कलशांची शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेतील वेशभूषा आकर्षक ठरल्या.
मुरुड बाजारपेठेच्यावतीने मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयातुन श्रीराम अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. अक्षता कलशाचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रीरामाचा जयघोषात करत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत बालकलाकरांनी श्रीरामाची वेशभूषा केली होती. निल गोबरे हा श्री राम झाला होता. सारा करंबे सीतामाई झाली होती. हर्ष गोबरे यावे हनुमानाची वेशभूषा केली होती. दशरथ राजाची वेशभूषा दक्ष जैन, कौसल्या माता-धार्मी लखंबे, भरत-अर्जुन गोबरे यांनी साकारली. तर बालपणीचा श्रीराम-अर्णव कासार, श्रवण नाझरे व राघव करंबे, हनुमान -रिधान हणमंते व शौर्य सद्रे तर शबरी-ज्ञानदा हणमंते हिने केली होती. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
प्रत्येक रामभक्तांनी हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवी टोपी परिधान करून महिला-पुरुष, युवक-युवती मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरची मिरवणूक मुरुड-जंजिरा नगरपरिषद, बाजारपेठ, आझाद चौक, पुरकर नाका आदी भागातुन काढण्यात आली होती. यावेळी ढोलताशांचा गजर व फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मिरवणूकीचे स्वागत केले. वातावरण श्रीराममय बनले होते. यावेळी 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची माहिती पत्रकाद्वारे घरोघरी देण्यात आली.