| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
आज देश हुकूमशाहीच्या दिशेने जात असून, हे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी परखड टीका शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना, शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक तयारीसह निवडणूक मैदानात जोरदार एन्ट्री केली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर लाल बावटा फडकणे ही जनतेची आणि काळाची गरज आहे, असा ठाम आणि परखड निर्धारही चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा शेकाप हा जनतेचा खरा पक्ष असून, शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, हेही त्यांनी ठासून सांगितले. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापने तरुण, सुशिक्षित व समाजकार्यात झोकून दिलेले उमेदवार मैदानात उतरवले असून, ‘शेकाप आणि रायगड जिल्हा परिषद हे अटळ समीकरण आहे’, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
लोकाभिमुख व जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवायच्या असतील, तर जिल्हा परिषदेत शेकाप सत्तेत असणे अत्यावश्यक आहे, असे ठाम मत पाटील यांनी मांडले. मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जात असून, जनता ताकदीने शेकापच्या पाठीशी उभी राहून भरघोस बहुमत देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेकाप सोडून गेलेल्यांमुळे आमच्या मताधिक्यावर कसलाही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांचे दावे फेटाळले. रायगडमध्ये शेकापचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करत चित्रलेखा पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
देशात लोकशाहीला घातक वातावरण : चित्रलेखा पाटील
