देशात समान नागरी कायदा आवश्यक

केंद्रानं पावलं उचलावीत; न्यायालयानं दिले आदेश!
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहात असल्यामुळे समान नागरी कायदा असण्याची गरज असून, ती लागू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. गतवर्षी सीएए आणि एनआरसीसोबत समान नागरी कायदाचा मुद्दाही चर्चिला गेला होता. एका घटस्फोटासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने देशात समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.

भारतात हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा, भारतीय ख्रिश्‍चन विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा असे अनेक कायदे आहेत. याशिवाय, मुस्लीम समाजामधल्या या चालीरितींसाठीचे बहुतांश नियम घटनात्मक कायदे स्वरूपात नसून, ते त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायदान प्रक्रिया क्लिष्ट ठरते. विशेषत: वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्ती जेव्हा विवाह किंवा घटस्फोटासारख्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या असतात, तेव्हा त्यांना कोणत्या कायद्याप्रमाणे न्यायदान करावं, असा प्रश्‍नदेखील उपस्थित होतो. या पार्श्‍वभूमीवर समान नागरी कायदा आल्यास या सर्व गोष्टींसाठीचे समान नियम सर्व धर्मीयांना लागू करता येऊ शकतील, अशी भूमिका आजवर अनेकदा मांडण्यात आली आहे. या संदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये त्या त्या धर्माचे किंवा समुदायासाठी केलेले कायदे न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकणार नाहीत आणि सर्व भारतीयांना एका समान कायद्याच्या आधारे न्याय देता येईल, असं देखील मत न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

दरम्यान, अशा प्रकरणांचा न्यायालयांनी अनेकदा सामना केल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी नमूद केलं. 1955 सालचा हिंदू विवाह कायदा मीना समूहातील व्यक्तींना लागू होतो का? यासंदर्भातल्या एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयानं समान नागरी कायद्याविषयी आपली भूमिका मांडली आहे. वैयक्तिक समूहाचे किंवा धर्माचे कायदे असल्यामुळे त्यांच्यात न्यायदान करताना अनेकदा अडचण निर्माण होते. वेगवेगे समूह, जाती आणि धर्मांचे लोक वैवाहिक बंधनात असतात. मात्र, त्यानंतरच्या वादांमध्ये कायद्याचा प्रश्‍न निर्माण होतो, असं न्यायमूर्ती प्रतिभा सिंह म्हणाल्या आहेत.

घटनेच्या कलम 44 नुसार पुरस्कृत करण्यात आलेल्या समान नागरी कायद्यावियी अनेकदा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील भूमिका मांडली आहे. हा नागरी कायदा भारतातील सगळ्यांसाठी समान असेल. त्यामुळे लग्न, घटस्फोट किंवा वारसा अशा प्रकरणांमध्ये समान नियम लागू करण्यास यामुळे मदत होईल.
न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

Exit mobile version