रौद्रभीषण कोकणकड्याची आव्हानात्मक मोहीम
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
लाव्हारसातून उत्पत्ती झालेली महाराष्ट्रातली सह्याद्री पर्वताची अजस्त्र रांग म्हणजे निसर्गाच्या रौद्ररूपाचं एक अद्भुत आश्चर्य. यातला हरिश्चद्र-कळसुबाई रांगेतला सर्वाधिक 1800 फूट उंचीचा महाकाय रौद्रभीषण कोकणकडा गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. दोरीच्या साहाय्याने हा कडा उतरण्याचा थरार अनुभवणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असते. गिर्यारोहकांना या थराराची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी डोंबिवलीतल्या सह्याद्री रॉक डवेंचर या संस्थेने रविवारी (दि.14) आयोजित केलेल्या या मोहिमेत श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे दुर्गप्रेमी मिलिंद जाधव यांनीही सहभाग घेतला होता.
हा थरार अनुभवण्यासाठी हरिश्चंद्र गडालगत असलेल्या कोकण कड्यावर पोहोचावं लागतं. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यातील हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावातून पहाटे साडेतीन वाजता कडाक्याच्या थंडीतून या मोहिमेला सुरुवात होते. साडेपाच वाजता हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर गडदर्शन आणि चहा नाश्ता आटपून कोकण कड्यावरचा भन्नाट वारा आणि बोचऱ्या थंडीतच गिर्यारोहकांना या मोहिमेबद्दल माहिती आणि सुरक्षेची साधन देऊन सुसज्ज करण्यात येतं. त्यानंतर तीन टप्प्यात अवरोहण होणाऱ्या या मोहिमेतले सहभागी सदस्य आयोजकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत कड्यावरून खाली उतरण्याचा थरार अनुभवत एका पाठोपाठ एक कोकणकड्याच्या पायथ्याशी यशस्वीरित्या उतरतात. अशाप्रकारे सहभागी झालेल्या सोळा सदस्यांची ही मोहीम आयोजकांच्या अथक प्रयत्नांनी यशस्वी होते.
पुढे अंदाजे चार ते पाच किलोमीटरचा तीव्र उतारातला दगड धोंड्याचा खडतर मार्ग दुपारच्या उन्हात पार करत संध्याकाळी पाच वाजता वाल्हीवरे या आदिवासी पाड्यात पोहोचल्यावर सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. मिलिंद यांच्याबरोबरच केरळ मधल्या तीन गिर्यारोहकांसह पुणे आणि ठाण्याबरोबरच अन्य ठिकाणच्या एकूण सोळा सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. दुर्गभ्रमंतीची आवड असणाऱ्या व या आधी सुध्दा अशा अनेक खडतर आणि तेवढ्याच धाडसी मोहीमा यशस्वीरीत्या पुर्ण करणाऱ्या मिलिंद जाधव यांच्या या थरारक, धाडसी आणि प्रेरणादायी कामगिरीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पर्यटकांना प्रचंड आकर्षण
अजस्त्र पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील हरिश्चंद्रगडाचा हा विशाल डोंगर ठाणे, पुणे, व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला असून त्याची उंची सुमारे 4,000 फूट इतकी आहे. तसेच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शिखर म्हणून प्रसिद्ध असणारे तारामती शिखरसुद्धा याच गडाचा भाग आहे. केवळ एका खांबावर असलेली मोठी केदारेश्वराची गुहा असेल किंवा जुने हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असेल या सगळ्या या गडाच्या बाबी पर्यटकांना मोहून टाकतात.






