भय इथले संपले नाही;पाऊस अन् दरडीचे संकट आजही कायम

। पोलादपूर । शैलेश पालकर ।
पोलादपूर आणि नैसर्गिक आपत्ती यांचं अतुट असं नातं गेल्या अनेक पिढ्या जुळून आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या तालुक्याला कुठेना कुठेतरी मोठी दुर्घटना घडून मनुष्यहानीसह मालमत्तेचे नुकसान होत असते.त्यामुळे येथील जनतेला पावसाळा सुरु झाला की, धडकी भरते, अन् भय इथले संपले नाही, असेच म्हणण्याची वेळ येते. तालुक्यात 2005 नंतर गेल्यावर्षी 2021 च्या 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या; तर अनेक गावांमध्ये महापूराची परिस्थिती उद्भवली. देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावांत 5 तर साखर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी गावात 6 अशा एकूण 11 जणांचा दरडीखाली मृत्यू ओढवला आणि तेवढेच लोक जखमीही झाले.

सार्वजनिक मालमत्ता नष्ट
पोलादपूर तालुक्यातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेला झुलता पुल वाहून गेला आहे. कापडे बुद्रुक ते खांबेश्‍वरवाडी दरम्यानच्या पुलाचा डावीकडील भाग घोडवनी नदीच्या पात्रात वाहून गेला. पोलादपूर-महाबळेश्‍वर रस्त्यावरील नगरपंचायतीची जॅकवेल आणि नदीची पिचींगसदृश्य संरक्षक भिंत वाहून गेली. चाळीचा कोंडजवळील पुल ढासळला असून साखर बोरजजवळील पुलाचा जोडरस्तही नदीने प्रवाह बदलल्याने वाहून गेला. सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, नळपाणीयोजना, विहिरी, तलाव, साकव, पुल, ऍप्रोच रोड, शाळागृहे, मंदिर व सभागृहे, ग्रामपंचायत कार्यालये, पायवाट पायर्‍या अशा अनेक सरकारी मालमत्तांची वासलात लागली. सर्वाधिक पाऊस महाबळेश्‍वर येथे तसेच आंबेनळी घाटात झाल्यामुळे पुरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी दरडी कोसळल्या.

तालुक्यातील दरडग्रस्त गावे
गेल्यावर्षी पोलादपूर तालुक्यातील चरई, केवनाळे, तुटवली, परसुले, माटवण, हावरे, कणगुले, धामणदिवी, हळदुळे, साखर चव्हाणवाडी, तुर्भेखोंडा, बोरावळे कोडवेकोंड, केवनाळे आंबेमाची, वाकण धामणेची वाडी, चांदके, खोपड, मोरसडे आडाचाकोंड, चिखली, वडघर सोनारवाडी, कामथे, कामथे फौजदारवाडी, मोरसडे बालमाची, मोरसडे सडेकोंड, आडावळे बुद्रुक, लहुळसे, कालवली भोसलेवाडी, कातळी कामतवाडी, कुडपण खुर्द, किनेश्‍वर, किनेश्‍वर पेठेवाडी, कापडे खुर्द रवतळवाडी, कुंभळवणे कापडे खुर्द, वाकण मुरावाडी, नाणेघोळ कुदूवाडी कदमवाडी, नाणेघोळ गावठाण, नाणेघोळ बाबरवाडी, नावाळे, महादेवाचा मुरा-बोरघर, चांदले, मोरसडे दिवाळवाडी, कुडपण बुदु्रक, चांभारगणी खुर्द, साखर सुतारवाडी आणि पोलादपूर शहर, तुर्भे बुद्रुक, सवाद, चरई, वाकण, कापडे बुद्रुक आणि माटवण आदी गावांचा दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांमध्ये समावेश होता.

मदतीचा ओघ
दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना दै.कृषीवल, कर्तव्य फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची रायगड शाखा, महाराष्ट्र मराठी मंडळ गोवा तसेच अनेक राजकीय व्यक्ती, संस्था तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्‍या मंडळींनीही रोख रकमेसह वस्तुरूप देणग्या आणि मदतीचा ओघ पोलादपूर शहरासह केवनाळे व सुतारवाडी तसेच तालुक्यातील विविध दरडग्रस्त व पूरग्रस्त भागामध्ये पोहोचविला.

Exit mobile version