शेकापचे राजेश केणी यांची तोफ धडाडली
| पनवेल | वार्ताहर |
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या विद्यमान खासदार महोदयांना मत मागण्याचा कुठलाही अधिकार नाही, असा खरमरीत इशारा देत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी यांनी बारणे यांना ठणकावले आहे.
ते म्हणाले की, गेली दहा वर्षे अन्यायकारी नैना प्राधिकरण विरोधात पनवेल-उरणमधील शेतकरी लढा लढत आहेत. यामध्ये गाव जनजागृती बैठका ज्या आजपर्यंत किमान 300 झाल्यात. 25 दिवस सुरू असलेले गाव बंद आंदोलन झाले, 5000 शेतकऱ्यांचा मंत्रालयावर पायी मोर्चा काढला गेला, 4000 वाहनांचा नैना प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा गेला होता. बोरले येथे 35 दिवस साखळी उपोषण चालले, महिलांचा लक्षणीय सहभाग असणारे पळस्पे येथील सलग नऊ दिवस झालेले उपोषण, तुरमाळे येथे नैना विरोधात केलेले 8 दिवस उपोषण, एवढा पराकोटीचा विरोध होत असतानादेखील खासदार महोदय येथे फिरकलेदेखील नाहीत. या आंदोलनाच्या वेळी कित्येक शेतकरी बांधवांवर नियमबाह्य पद्धतीने गुन्हे दाखल झालेत. ही आंदोलने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली होती, यात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता, मग खासदार महोदयांनी शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी येणे अपेक्षित होते. सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या या महाशयांना मते मागण्याचा कुठलाही अधिकार नाही.
जी कथा नैना प्रकल्पाच्या बाबतीत, तीच कथा विरार-अलिबाग कॉरिडोर रस्त्यासंदर्भात देखील आहे. या प्रकल्पातील अन्यायकारक भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी कित्येक वेळा संघर्ष केला. शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला कमी असल्याकारणाने आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संघर्ष केला. या ठिकाणीदेखील खासदार असणारे श्रीरंग बारणे कधीच आले नाही. मुंबई ऊर्जा प्रकल्पामध्येदेखील शेतकरी संघर्ष करताना खासदार असणारे श्रीरंग बारणे कधीच फिरकले नाहीत. येथे प्रकल्प साकारण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला गेला आहे. विरोध करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना उचलून अक्षरशः तुरुंगात डांबले आहे. राष्ट्रीय प्रकल्पाकरिता जमिनी घेत असाल तर त्या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता त्या पद्धतीनं पुनर्वसन मूल्य दिले पाहिजे, याकरिता वास्तविक खासदारांनी दिल्ली दरबारी भांडणे आवश्यक होते.
परंतु या शेतकऱ्यांनी पाठवलेल्या पत्रांवर खासदार महोदयांनी दखल घेण्याचीदेखील कष्ट घेतले नाहीत. उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पक्षाच्या माध्यमातून यांना दोन वेळा खासदार केलं त्या पक्ष नेतृत्वाचे जे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? म्हणूनच आता हवा नवा खासदार या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची मशाल हाती घ्यायची आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, ही लढाई तुमच्या-आमच्या अस्तित्वाची असेल. आपल्या जमिनी घेऊन आपल्याला देशोधडीला लावणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल, तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासमोरील मशाल चिन्हाचे बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा.