संसदेतील सध्याची परिस्थिती वाईट

सरन्यायाधीश रमण यांनी लोकप्रतिनिधींना सुनावले
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशाच्या कायदेमंडळात आणि राज्यांतील सभागृहांमध्ये चालणार्‍या चर्चांची सध्याची परिस्थिती वाईट आहे, अशा शब्दांत न्यायमूर्ती रमण यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना सुनावले आहे. देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या प्रचंड गोंधळ आणि राज्यसभेतील अभूतपूर्व प्रकारानंतर या गोंधळाची देशभर चर्चा सुरू आहे. सत्ताधार्‍यांकडून विरोधकांना यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. तर, विरोधकांकडून सत्ताधार्‍यांवर आरोप केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशाचे सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीने चर्चा होत आहेत, त्यावर परखड शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश रमण यांनी देशात सुरुवातीच्या काळात कायदेमंडळांमध्ये कायद्यांवर होणार्‍या चर्चांचा संदर्भ दिला आहे. लोकसभा, राज्यसभा, राज्यांमधील सभागृहांतले सुरुवातीचे सदस्य हे मोठ्या प्रमाणावर वकील वर्गातले होते. संसदेत, राज्यांच्या विधानसभांमध्ये त्यावेळी चालणार्‍या चर्चा जर तुम्ही पाहिल्या तर त्या अभ्यासपूर्ण व्हायच्या. ते बनवत असलेल्या कायद्यावर सविस्तर चर्चा करायचे, असं रमण यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, जुन्या काळातील उदाहरण देताना भारताचे सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांनी सध्याची परिस्थिती वाईट असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा बुद्धिवादी आणि वकिलांसारख्या व्यवसायातील लोक सभागृहांमध्ये नसतात तेव्हा हे घडतं, अशा शब्दांत रमण यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. लीगल कम्युनिटीने आता नेतृत्व करण्याची, सामाजिक आयुष्यात सहभाग घेण्याची वेळ आली आहे, असं देखील रमण यांनी बोलून दाखवलं.

Exit mobile version