‘मेड इन चायना’चा वजन काट्यांना धोका

चीनी बवाटीचे वजन काटे बाजारात दाखल;
ग्राहकांची आर्थिक लुट होण्याची चिंता

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यामध्ये चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांची विक्री काही व्यवसायिक बाजारात करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अनधिकृत वजन काट्याचा धोका वाढल्याने ग्राहकाला योग्य वजनात माल मिळण्यास अडथळे निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वैध मापन शास्त्र विभाग कामाला लागले असून जिल्ह्यामध्ये जनजागृती सुरु करण्यात आली आहे.

शेजारच्या राज्यातून वजन काट्यांचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात खुलेआम व्यापाऱ्यांना विकले जात आहे. त्यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक, विक्रेते यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य शासनाचा आर्थिक महसूल बुडत आहे. त्यानुसार वैध मापन शास्त्र विभागाकडे लेखी व ऑनलाईन स्वरुपात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वजन काट्यांना राज्य व केंद्र सरकारची वैधानिक मान्यता नसतानाही दुकानदारांना चीन बनावटीचे वजन काटे विकले जात आहे. वजनाने हलके, सहज हाताळता येणारे आणि आकर्षक वजन काटे कमी किंमतीत मिळत असल्याने काही दुकानदार या वजन काट्यांचा वापर करीत असल्याचा प्रकार वैध मापन शास्त्र विभागाच्या निदर्शनास आला आहे.

अनधिकृत वजन काट्यांना कंपनीचे स्टीकर लावून ते बाजारात विकत आहेत. ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नसल्याची भिती निर्माण झाली आहे. परवाना धारकांकडूनच वैध वजन मापे, तोलन मापन, उपकरणेे खरेदी करण्यात यावी. तसेच अशा प्रकारची उपकरणे वापरावी असे आवाहन वैध मापन शास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे.

वजन मापे तोलन मापन उपकरणांचे उत्पादक, विक्रेते व दुरुस्तकांना विभागाकडून अधिकृत परवाना देण्यात आला आहे. अशा परवाना धारकांकडूनच उपकरणे खरेदी करून वापरावी. अवैध, अप्रमाणित वजन मापे तोलन मापन उपकरणांची विक्री करणे व ती वापरणे वैध मापन शास्त्र, अधिनियम 2009 व त्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन आहे. अनधिकृत उपकरणे वापरण्याबरोबरच विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.

सं. ना. कवरे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, रायगड
Exit mobile version