बसस्थानकासमोरील धोकादायक नाल्याची होणार दुरुस्ती
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
पालीतील बस स्थानकासमोरील स्लॅब तोडलेल्या धोकादायक व आरोग्याला हानिकारक नाल्याची दुरुस्ती करण्याची मागणी आरपीआय (आठवले गट) कोकण प्रदेश नेते तथा सुधागड तालुका प्रेस क्लब कार्याध्यक्ष पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी पाली नगरपंचायतकडे निवेदनाद्वारे केली होती. अन्यथा येत्या 22 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला होता. त्या अनुषंगाने उपोषणापूर्वी पाली नगरपंचायतीने हा नाला दुरुस्त करण्याचे लेखी पत्र सोमवारी (दि.15) रवींद्रनाथ ओव्हाळ यांना दिले आहे.
नगराध्यक्षा प्रणाली शेळके, उपनगराध्यक्ष अरिफ मणियार, नगरसेवक, पत्रकार, आरपीआय सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे, कार्याध्यक्ष भगवान शिंदे, यांच्या उपस्थितीत आमरण उपोषणा अगोदर नाला दुरुस्तीचे काम सुरु केले जाईल असे लेखी आश्वासन पत्र मुख्याधिकारी विद्या येरूनकर यांनी दिले. त्यामुळे तूर्तास हे उपोषण स्थगित केले गेले आहे. मात्र दिलेल्या मुदतीत नाला दुरुस्त झाला नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आवारात उपोषणास बसणार, असा इशारा रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी दिला आहे.