चौलमळा येथील धोकादायक खड्डा बुजविला

सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परता

| चौल | प्रतिनिधी |

सरकारी अधिकारी म्हणजे कामचुकार किंवा आश्वासनापलीकडे काहीच नाही, असाच अनुभव प्रत्येकाला येत असतो. परंतु, कामाची दखल घेत ते काम तात्काळ पूर्ण करणारेही अधिकारीसुद्धा या प्रशासनात आहेत, याची प्रचिती नुकतीच आली. चौलमळा कृष्णादेवी मंदिरासमोर पडलेला खड्डा तातडीने बुजवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखविल्याने याठिकाणचा अपघाताचा धोका टळला आहे.

सरकारी अधिकाऱ्याकडे एखादं काम घेऊन गेल्यावर करतो, बघतो असे म्हणत होणारा कामचुकारपणा किंवा ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ याचाच अनुभव अनेकदा आपल्याला येत असतो. परंतु, प्रशासनात कार्यरत असताना असेही काही अधिकारी आहेत, की आपल्या शब्दाला जागत ते काम पूर्ण करतात. याबाबत हकीकत अशी की, अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावाच्या हद्दीत कृष्णादेवी मंदिरासमोरच रस्त्याची साईडपट्टी खचून मोठ मोठे खड्डे होते. तसेच त्या खड्ड्यातून निघणारी खडी रस्त्यावर पसरल्याने त्यावरुन घसरुन तीन-चार मोटारसायकलस्वारांचा अपघात झाला होता. दरम्यान, नवरात्रौत्सवात या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ वाढणार असल्याची पूर्वकल्पना देत अपघाताचा धोका निर्माण झाल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. डोंगरे यांनी तात्काळ ठेकेदार नदीम शेठ यांना ही माहिती देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची सूचना केली. त्यानुसार शनिवार, दि.14 रोजी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. तसेच काही दिवसात डांबरीकरण करुन रस्ता सुस्थितीत करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. डोंगरे यांनी दिले. ग्रामस्थांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतल्याने चौलमळा गावाच्या वतीने गावप्रमुख रवींद्र घरत, जितेंद्र पाटील यांनी श्री. डोंगरे आणि ठेकेदार नमीद शेख यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version