घारापूरी येथील धोकादायक राजबंदर जेट्टीची लवकरच दुरुस्ती होणार

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची 2 कोटी 83 लाखांची निविदा; घारापुरी ग्राामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश

| उरण | वार्ताहर |

मागील वर्षी कोसळलेल्या उरण तालुक्यातील घारापुरी-राजबंदर जेट्टीची दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दोन कोटी 83 लाख खर्चाचे टेंडर काढले आहे. घारापुरी ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दोन वर्षी 50 वर्षं जुनी असलेल्या राजबंदर जेट्टीचा स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे उरण, न्हावा समुद्रमार्गे जगप्रसिद्ध घारापुरी लेण्या पाहायला येणार्‍या पर्यटक आणि नागरिकांसाठी एकमेव असलेल्या जुन्या राजबंदर जेट्टी चढ-उतार करण्यासाठी अत्यंत धोकादायक ठरली आहे.

महाशिवरात्री निमित्ताने मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटक आणि नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरलेल्या जेट्टीच्या स्लॅबला खालून तात्पुरती उपाय म्हणून बांबूच्या वाश्यांनी टेकू देण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर यांनी जेट्टीच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर मेरीटाईम बोर्डाचे सहाय्यक अभियंता पी.एल. बागुल यांनी धोकादायक राजबंदर जेट्टीची पाहणीही केली. पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी जेट्टी दुरुस्तीच्या कामासाठी अंदाज पत्रक तयार काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.

मात्र कोरोना काळात सर्व कामकाज बंद झाल्याने जेट्टीच्या दुरुस्तीचे काम वर्षांपासून रखडले होते. परंतु, धोकादायक राजबंदर जेट्टीच्या दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने 2 कोटी 83 लाख 61 हजार 746 रुपये खर्चाची निविदाही काढण्यात आली आहे. वर्षभराच्या मुदतीत जेट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. धोकादायक राजबंदर जेट्टीच्या दुरुस्तीनंतर उरण,न्हावा समुद्रमार्गे घारापुरी लेण्या पाहायला येणार्‍या हजारो पर्यटक आणि नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याची माहिती सरपंच बळीराम ठाकुर यांनी दिली आहे.

Exit mobile version