प्रवाशांच्या मागणीला यश, अपघाताचे संकट टळले
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे टाकलेल्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे ऐन गणेशोत्सवात एका महिलेला जीव गमवावा लागला. येथील धोकादायक गतिरोधकांमुळे प्रवाशांमध्ये अपघाताची भीती कायम होती. अशा गंभीर घटनेचा विचार करत, अनेकांच्या मागणीनुसार बांधकाम विभागाकडून तालुक्यातील धोकादायक गतिरोधक काढून टाकण्यात आले आहेत.
गणेशोत्सवात भोस्ते येथे राहणार्या महिला श्रीवर्धन ते वडवली प्रवासात दांडगुरी येथे गतिरोधकावर वाहन आदळल्याने पाठीमागून तोल जाऊन खाली पडल्या. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तालुक्यातील दांडगुरी, बागमांडला, हरिहरेश्वर मार्गातील रस्त्यावर उभारलेले गतिरोधक त्रासदायक असल्याची तक्रार प्रवाशी वर्गातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने करण्यात येत होती. यामध्ये प्रवासात वाहनांचे होणारे नुकसान, त्यासोबतच होणारा शारीरिक त्रास आणि अपघाताची भीती कायम असल्याने गतिरोधक हटवण्याची मागणी वाहतूक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून करण्यात आली.
गतिरोधकांच्या नावाखाली काही ठिकाणी उभारलेल्या टेकडांमुळे अपघात, नागरिकांची शारीरिक, तसेच वाहनांचीही हानी होत आहे. यातून गतिरोधक उभारताना कोणत्या नियमांची अंमलबजावणी केली, असाच प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः दुरवरून आलेल्या पर्यटकांना याची कल्पना नसल्याने अपघात घडत होते. हे स्पीड ब्रेकर आता काढून टाकण्यात आले आहेत.
अनेक वाहतूक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी गतिरोधक हटवण्याची मागणी केल्याने त्या-त्या ठिकाणचे गतिरोधक काढण्यात आले आहेत.
– तुषार लुंगे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग