मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री 10 पासून प्रचारबंदी लागू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी एक डिसेंबरपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार असणार आहे. रात्री दहा पासून प्रचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सभा, मोर्चे, ध्वनीक्षेपाचा वापर करता येणार नसल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965मधील कलम 23 नुसार मतदानाच्या दिवशी कोणतीही जाहिर सभा आयोजित करणे, भरविणे किंवा त्यात सहभागी होणे प्रतिबंधित आहे. मतदानादिवशी शांतता राखण्यासाठी ही तरतूद लागू आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसार माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025मध्ये मतदानाच्या एक दिवस आधी रात्री 12 पासून प्रचारबंदी लागू करण्याचे आदेश होते. तसेच 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश मध्ये मतदानाच्या 24 तास आधीपासून प्रचारबंदीचा उल्लेख होता. विविध आदेशांतील या वेळेतील फरकामुळे निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व बाबींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने नियमात सुधारणा करीत एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेपर्यंतच प्रचार करता येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. प्रचारासाठी एक दिवस वाढल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून या कालावधीत मतदारांपर्यंत पोहचण्याची संधी उपलब्ध होणार आहे.







