| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील नशामुक्ती केंद्रात एका 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून, संशयास्पद मृत्यू असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे पोलीस या घटनेचा कशा पद्धतीने शोध घेतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरण अनबू हरिजन असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मुंबई येथील रहिवासी आहे. बुधवारी (दि.10) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने केंद्रातील स्टोअर रुममध्ये पंख्याला दोरीने लटकून गळफास घेतला. ही बाब तेथील मंडळींच्या लक्षात आल्यावर त्याला अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घोषित केले.
याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.11) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा परहूरपाडा परिसरात सुरु आहे. या तरुणाला बाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी गळफास घेतल्याचे चित्र दाखविण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.







