स्मशानभूमी मोजतेय अखेरची घटका
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील कळंब बोरगाव गावची स्मशानभूमी अखेरची घटका मोजताना दिसत आहे. कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोरगाव गावची स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या स्मशानभूमी ची दुरुस्तीच झाली नसल्याने बिकट अवस्था झाली आहे. हिंदू धर्मा संस्कारानुसार व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याचे अंत्यविधी पवित्र मानले जाते परंतु बोरगाव गावासाठी अंत्यविधी साठी महत्त्वाची असणारी स्मशानभूमी ची अवस्था पाहून मृत आत्म्यास देखील मोक्ष मिळणार नाही अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्मशान भूमीच्या छतावरचे सर्व लोखंडी पत्रे सडले असून काही पत्रे उडून गेले आहेत. तसेच मृतदेह ठेवण्यासाठी देखिल जागा नाही.
अंत्यविधी साठी येणाऱ्या माणसांना उभे राहण्यासाठी देखील पुरेशी जागा नाही. छतावरचे पत्रे कधी खाली पडून घातपात होईल हे सांगता येणार नाही. पावसाळी दिवसात तर ग्रामस्थांना ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत, अशी अवस्था असताना देखील मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देताना देखील सुविधांचा बोजवारा पाहता बोरगावकरांच्या स्मशानयातना संपणार कधी असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणी बोरगाव गावाच्या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, त्याच प्रमाणे तिथे विजेच्या दिव्याची देखील व्यवस्था करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.