। आगरदांडा । प्रतिनिधी ।
पलाश प्रॉडक्शनच्या संचालिका प्रज्ञा पळसुले या गेली अनेक वर्षे गीतलेखन आणि कन्टेन्ट रायटिंग या क्षेत्रात कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रे, मासिके व मीडिया प्रोडक्शन हाऊससाठी त्यांनी काम केले आहे. गेल्या काही महिन्यात प्रज्ञा यांनी दिग्दर्शित केलेली मधुर गाणी युट्युब व टीव्हीवर प्रदर्शित झाली असून त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. यातील 2 गाण्यांचे अनावरण व पलाश बॅनरचे उद्घाटन मुलुंड मधील ‘महाराष्ट्र सेवा संघ’ हॉल येथे दिमाखात पार पडले.
या कार्यक्रमाला ऋतुजा कुलकर्णी, कौशल इनामदार, अनिल थत्ते व संजय गुंजाळ, शाश्वत सौरव, आकाश घरत, आरोह कांगो आदिंसह मान्यवर उपस्थिती होते. प्रज्ञा पळसुले यांनी आपल्या ‘पलाश प्रोडक्शन्स’ या नवीन प्रोडक्शन बॅनरची स्थापना केली असून त्या अंतर्गत विविध गाणी, डॉक्युमेंटरी आणि चित्रपट निर्मिती करणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. या अंतर्गत ‘मीराहिर’ या नव्याकोर्या म्युझिक अल्बमची घोषणा केली आहे. हा अल्बम एक ‘फीलगुड प्रेम कहाणी’ असून त्यात बहुरंगी भावना असलेली 6 गाणी असतील, असे प्रज्ञा पळसुले यांनी आपल्या भाषणावेळी आपले मत व्यक्त केले.