| मुंबई| वृत्तसंस्था |
हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय संघहिताचा असून, भविष्यातील संघबांधणीसाठी महत्त्वाचा आहे, असे मत माजी क्रिकेटपटून सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. नव्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवल्यास तो संघामध्ये नवी ऊर्जा आणेल. त्यामुळे याचा संघाला फायदाच होईल. तोटा होणार नाही, असे गावसकर यांना वाटते. गावसकर पुढे म्हणाले की, हा निर्णय चुकीचा की बरोबर असे बघू नये, रोहित शर्माला भारतासह मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्वही सांभाळावे लागते. सातत्याने क्रिकेट खेळून तो थकला आहे. त्यामुळे कर्णधार बदलण्यात आला आहे. हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये नवा विचार घेऊन येईल. हा निर्णय संघहिताचा आहे.
मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले. त्यानंतर या संघाला अजिंक्यपदावर नाव कोरता आले नाही. मुंबई इंडियन्सला 2021 व 2022 मध्ये प्ले ऑफमध्येही पोहोचता आले नाही. यावर्षी त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला, पण या संघात पूर्वीसारखा जोश दिसून आला नाही. रोहित शर्माच्या फलंदाजीतही व्यस्त वेळापत्रकामुळे फरक पडू लागला आहे. त्याच्या बॅटमधून धावाच निघाल्या नाहीत. याचा फटकाही संघाला बसत असल्याचे गावसकर यांनी स्पष्ट केले.