। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात 23 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट मार्ग बंदच आहे. दरडी काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अजूनही सुरूच आहे, मात्र अनेक ठिकाणी माती, दगड रस्त्यावर घरंगळत येत आहेत तसेच कळकदरा ह्या ठिकाणी एका बाजूचा रस्ता खचला असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
त्यामुळे दरडी पूर्ण काढून झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सर्वेक्षण झाल्यानंतरच आंबा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे या परिस्थितीवर लक्ष आहे. त्यामुळे आंबा घाट मार्ग कधी सुरू होणार ? याची अनेकांना चिंता वाटू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्राला पूर्वेकडून जोडणारा मुख्य रस्ता म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे हा रस्ता पाच दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असल्याने वाहनधारक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. घाट बंद असल्याचा फटका साखरपा, देवरुख, पाली, आदी ठिकाणच्या व्यापार्यांना बसला आहे. सर्वच जण आंबा घाट केव्हा सुरू होईल? तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे आलेले हे संकट लवकर दूर होण्याची वाट पाहत आहेत.







