| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये सध्या तापमान वाढले असून उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळा प्रयत्न केला जात आहे. त्यात शरीरात गारवा मिळावा, यासाठी ताडगोळे खरेदीवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे ताडगोळ्याला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासाठी ताडगोळ्याचा आधार मिळत आहे.
सध्या हवामानात अमुलाग्र बदल झाला आहे. उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे बाहेर पडणेदेखील नकोसे झाले आहे. उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी काहीजण मफलर, स्कार्पचा वापर करीत आहेत. काही जण गॉगल तर काही जण सावलीचा आधार घेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उन्हाच्या या कालावधीत ताडगोळे शरीरासाठी खुप उपयुक्त ठरत आहेत. आरोग्यासाठी गुणकारी असलेले तोडगोळे विक्रीला अलिबागसह अन्य ठिकाणी सुरुवात झाली आहे. चवदार आणि निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यात मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे रोग प्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व ताडगोळ्यांमध्ये आढळतात. त्यामुळे थंडावा देणाऱ्या या फळांना उन्हाळ्यात मागणी वाढू लागली आहे. सध्या 100 रूपयांना सहा ते आठ ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे.
अलिबागमधील नागरिकांना आणि पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडगोळे आहे. कोकण किनारपट्टीवर नारळी पोफळी प्रमाणेच ताडाची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग चौल, रेवदंडा, किहीम परीसरात ही झाडे पहायला मिळतात. या फळातील गर पाणीदार आणि चवदार असतो. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळ्याप्रमाणे वसंत ऋतूमध्येही मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध असतो. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात या ताडगोळ्यापासून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. ताडगोळ्याचे अनेक फायदे असल्याने पर्यटक आणि नागरिकही याकडे आकर्षित होत आहेत. उष्णता वाढल्यामुळे ताडगोळ्यांना मागणी वाढली आहे. ताडगोळे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
उन्हात ताडगोळ्यांचा आधार
