अलिबाग, पेण, कर्जत, नागोठण्यात खताचा तुटवडा
| खास प्रतिनिधी | रायगड |
अलिबाग, पेण, कर्जत, नागोठणे या विभागातील काही गावांमध्ये युरिया खताचा तुडवडा निर्माण झाला आहे. भातलावणीच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये युरिया खत टाकता आले नव्हते. आता पावसाची अधूनमधून उघडीप असल्याने युरिया खत टाकण्यात येत आहे. त्यामुळे युरिया खताला अचानक मागणी वाढल्याचे दिसून येते. आरसीएफ कंपनीसोबत समन्वय ठेवून खताची मागणी नोंदवण्यात येत आहे. लवकरच परिस्थिती बदलेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. दर खरीप हंगामात 16 हजार मेट्रिक टन युरियाची गरज असते. 8 ऑगस्टपर्यंत नऊ हजार 953.190 मेट्रिक टन एवढा खताचा पुरवठा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात मागील खरिपातील भातपिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. मात्र, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खत विक्रेत्यांकडे युरिया खताचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. रायगड जिल्हा राज्यात भाताचे कोठार म्हणून ओळखळा जातो. सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत. ऐन हंगामात शेतकर्यांना खताच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. पावसाने उघडीप दिल्याने आता शेतीच्या कामांनी जोर धरला आहे. शेतकर्यांना भातलावणीच्या वेळेला शेतात युरिया खत टाकता आले नाही. आता सर्वच ठिकाणी खत टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अचानक मागणी वाढली आहे. मागणीनुसार खताचा पुरवठा केला जात आहे. ज्या ठिकाणी खताची मागणी होत आहे, तेथे ते उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच हा प्रश्न मिटेल, अशी माहिती कृषी विभागाचे मिलिंद चौधरी यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.
रायगड जिल्ह्याने आठ हजार 339 मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली होती. त्यानुसार नऊ हजार 828 मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागणीपेक्षा एक हजार 589 मेट्रिक टन जादा खताचा पुरवठा केला असल्याची माहिती आरसीएफ कंपनीच्या विपणन विभागाने दिली. मागणी केल्यास ती पूर्ण करण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.