जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

| माथेरान | प्रतिनिधी |

अनेक पर्यटक हे खासकरून पायी भटकंती करण्यासाठी माथेरानमध्ये येत असतात. परंतु, काही महत्त्वाच्या पॉईंट्स वरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे आपण रस्त्यावरून चालत आहोत की एखाद्या नाल्यातून जात आहोत, असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे स्थळ म्हणून माथेरानमध्ये बाराही महिने पर्यटकांची रेलचेल सुरू असते. शनिवार आणि रविवारच्या दिवशी तर याठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. परंतु, प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली असून, पावसाळी बंधारे उत्तम प्रकारे करण्याऐवजी नको त्या ठिकाणी टाकण्यात आले असून, ही सर्व धरठोक कामे करून बिले प्राप्त केली जात आहेत. त्यामुळे जनतेच्या पैशाची नाहक उधळपट्टी करणे बंद करून आतातरी या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version