लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
| पेण | प्रतिनिधी |
नगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील नवनाथ उद्यानाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील कोनशीला गायब झाली असून, संपूर्ण परिसराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.
उद्यानाच्या संरक्षण भिंतीवरील लोखंडी जाळीही चोरीस गेली किंवा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे उद्यानाची सुरक्षितता धोक्यात आली असून, कोणालाही सहज प्रवेश करता येत आहे. विशेष म्हणजे, लहान मुलांसाठी बसवण्यात आलेले झोपाळे तुटलेल्या अवस्थेत असून ते वापरणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
या तुटलेल्या झोपाळ्यांमुळे लहान मुलांना इजा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालक वर्गात याबाबत भीतीचे वातावरण असून, उद्यानात मुलांना पाठवताना चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येकडे नगरपालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तरी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उद्यानाची दुरुस्ती करावी, तुटलेली साधने बदलावी आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.






