चार नव्या मार्गिकांच्या विकसित कामाला सुरूवात

वाहतूक कोंडी होणार दूर

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच दृष्टीने विमानतळाला जोडणारी दळणवळण व्यवस्था आणखी सुखकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एमएसआरडीसी यांच्या माध्यमातून पनवेलजवळील कर्नाळा स्पोर्ट्स परिसरात खांदा गावाजवळ चार नव्या मार्गिका विकसित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या नव्या मार्गिकांमुळे विमानतळ गाठणे विनावाहतूक कोंडी शक्य होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे. कर्नाळा स्पोर्ट्‌‍‍‍स अकादमी परिसरात नवी मुंबई विमानतळाचे प्रवेशद्वार असणार आहे. याठिकाणी या चार मार्गिका तसे इतरही कामे केली जाणार असून, याकरिता सुमारे 512 कोटींचा खर्च येणार आहे. एका वर्षात हे काम पूर्ण होणार असून, 1 मार्च 2025 ही या कामाची डेडलाईन असणार आहे. नव्याने उभारल्या जाणार मार्गिकेमध्ये नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ते कळंबोली, जेएनपीटी ते विमानतळ, कळंबोली ते कर्नाळा स्पोर्ट्स आणि कर्नाळा स्पोर्ट्सवरून थेट विमानतळ अशा मार्गिका असणार आहेत.

कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसरात पनवेल महापालिकेचे स्वराज्य नामक मुख्यालयदेखील उभे राहात आहे. भविष्यात लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ या मुख्यालयात वाढणार असल्याने या नव्या मार्गिकेचा फायदा या पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात येण्यासाठीदेखील होणार आहे. पनवेल शहरातून जाण्यासाठी सायन पनवेल महामार्गावरून ये-जा करावी लागते. या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या नव्या मार्गिकांमुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचे ताण कमी होणार असून, भविष्यात कार्यान्वित होणारे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ गाठणे सहज शक्य होणार आहे.

Exit mobile version