पुण्यातील गणेशभक्तांकडून गाड्यांचे बुकिंग
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई आणि पुणे येथे कामानिमित्त असलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणाकडे जातात. पुण्यातून कोकणात जाणार्या गणेशभक्तांसाठी खास करून एसटीकडून विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये ग्रुप बुकिंग आणि आरक्षणाची सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांकडून 200 गाड्या बुुकिंग करण्यात आल्या असून, यामध्ये 160 गाड्या आरक्षण, तर 60 गाड्या ग्रुप बुकिंग करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. गणेशोत्सव, शिमगा हे कोकणवासीयांचे आवडीचे सण. या सणाला पुणे, मुंबई व इतर ठिकाणी कामानिमित्त असलेले कोकणातील चाकरमानी गावी जातात. त्यामुळे एसटी, रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते.
या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून कोकणासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात येते. यंदाही एसटीच्या पुणे विभागाकडून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार सोडण्यात आलेल्या 200 अतिरिक्त गाड्या फुल्ल झाल्या असून, एसटीच्या आरक्षण सेवेला आणि ग्रुप बुकिंगला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.यंदा जोरदार आणि ढगफुटीसदृश पावसामुळे कोकणवासीयांचा गावी जाण्याचा रस्ता असलेल्या वरंधा घाटात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे यंदा एसटीतून कोकणात जाणार्या एसटी प्रवाशांचा प्रवास सातार्यामार्गे होणार आहे. तरी ही प्रवाशांकडून यंदा एसटी आरक्षणास प्रतिसाद मिळत आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 200 बस बुकिंग झाल्या आहेत.