मध्यप्रदेशातील धार गँगची महाराष्ट्रात दहशत

रसायनी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

| रसायनी | प्रतिनिधी |

रिसगाव व एमआयडीसी कॉलनीसह मोहोपाडा परिसरात सलग झालेल्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर रसायनी पोलिसांनी परराज्यातील कुख्यात धार गँगचा पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी रसायनी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मध्यप्रदेशसह अनेक राज्यात सक्रिय असलेल्या या टोळीतील आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी सुमारे 3 लाख रुपयांचे सोने, रोख दागिने आणि चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे.

मध्यप्रदेश येथीन धार गँग डोंगराच्या बाजूला असणाऱ्या उच्चभ्रृत इमारती गुगलवर सर्च करून बंद घरात घरफोडी करतात. त्यांनी इतर राज्यांसह महाराष्ट्रात देखील दहशत माजवली होती. दरम्यान, त्यांनी रसायनी हद्दीत तीन घरफोड्या केल्या आहेत. या घरफोड्या धार गँगने केल्याची माहिती समोर येताच रायगड पोलिसांनी मध्यप्रदेश व राजकोट-गुजरात येथे स्वतंत्र पथक रवाना करून कौशल्यपूर्ण तपास करीत मध्यप्रदेश आणि कर्नाटकातून दोन आरोपींना पकडण्यात यश आले. दरम्यान, रसायनी पोलीसांनी घटनास्थळाच्या कॅमेरांची पडताळणी केली. त्यावेळी धार गँगची टोळी चोरीचा माल घेऊन पनवेल रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्डकडे जात असल्याचे दिसून आले. यादरम्यान, एकुण धार गँगमधील चौघांचे फोटो प्राप्त केले. त्यानंतर मध्यप्रदेश येथील पोलिसांशी संपर्क करुन येथील तांडा गांव येथे जाऊन धार गँगचा शोध घेतला. त्यावेळी राजेंद्र उर्फ राजन रमेश बिल उर्फ आलवा, मोटला उर्फ अनिल काळा उर्फ केरु मोहनिया, रायसिंग बायसिंग मोहनिया, प्रकाश बायसिंग आलवा अशी त्या सराईत चोरांची नावे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रकाश बायसिंग आलवा (32) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन गुन्ह्यातील सोन्याचा सर, नाकातील नथ, सोन्याचा कॉईन व रोख रक्कम असे मिळून एकुण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे रसायनी येथे घटनास्थळी जुने सिमकार्ड मिळून आले होते. त्याच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेले संशयितांच्या आधारे धार-मध्यप्रदेश व राजकोट-गुजरात येथे स्वतंत्र पथक रवाना केले होते. त्यामुळे हा गुन्हा सुरेश रमेश शेंगर व त्याच्या 3 मित्रांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आरोपीचा शोध घेतला असता तो कर्नाटक येथील कारागृहात चोरीच्या गुन्ह्यात अटक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, त्याच्या विरुद्ध कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश व तेलगंणा येथे वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी व त्यांच्या पथकाने कर्नाटक येथून त्याला ताब्यात घेतले. यावेळी सुरेश शेंगर याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्या साथीदारांची नाव सांगितीली. या गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हस्तगत करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी पत्रकार परिषदेतून देत पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

Exit mobile version