प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, मुरुड डेपो नवीन गाड्यांपासून अद्याप वंचित
| मुरुड | प्रतिनिधी |
कल्याण येथून मुरुडकडे सुटलेली मुरुड डेपोची एसटी बस अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बसच्या दुरवस्थेचे फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याने एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुरुड आगाराला भंगार गोडाऊनचे रुप तयार झाले आहे. हा आगार अजून नवीन गाड्यापासून वंचित का? असा सवाल प्रवाशी वर्गाकडून केला जात आहे. मुरुड डेपोला नवीन बस मिळणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात आजही मुरुड डेपो नवीन गाड्यांपासून वंचितच आहे. विशेष म्हणजे, सीएनजी पंपच्या प्रतीक्षेत असलेल्या संबंधित पक्ष, यंत्रणा व विभागांनी या गाड्यांच्या दयनीय अवस्थेचा गांभीर्याने विचार करून प्राधान्यक्रमाने मागणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर प्रवासी सुरक्षितपणे प्रवासच करू शकत नसतील, तर केवळ श्रेयाची लढाई लढण्यासाठी प्रसिद्धीच्या बातम्या पेरणे कितपत योग्य आहे? असा रोखठोक सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे ग्रामीण आणि तालुकास्तरावरील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, एसटी महामंडळाने तातडीने या गाड्यांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच मुरुड डेपोला नवीन आणि सुरक्षित गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी व विविध संघटनांकडून होत आहे. दरम्यान, प्रशासन या गंभीर विषयाकडे कधी लक्ष देणार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला कधी प्राधान्य देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बसची अवस्था पाहता ती रस्त्यावर धावण्यायोग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा गाड्या बिनधास्तपणे प्रवाशांच्या जीवाशी खेळत रस्त्यावर कशा पाठवल्या जातात. अधिकाऱ्यांना लोकांच्या जिवाचे काहीच वाटत नाही का? अशा जीर्ण आणि असुरक्षित गाड्या प्रवाशांच्या सेवेत पाठवणे म्हणजे लोकांवर सूड उगवण्यासारखे आहे.
-ॲड. मनिष माळी
