ध्वजारोहणावरून वादंग ?
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच विविधांगी रंगात पाहायला मिळते. सत्तेसाठी आज याच्याबरोबरोबर चूल पेटवायची तर उद्या त्याच्या दरवाजात जाऊन खुर्चीसाठीचा खुंटा बळकट करायचा असा राजकीय संगीत खुर्चीचा खेळ आता रायगडकरांना नवीन राहिलेला नाही. रायगड जिल्ह्यात महत्वाच्या राजकीय पदांमध्ये पालकमंत्री पदावर सत्ताधारी पक्षांमधील मंत्र्यांची करडी नजर कायम असते, हे रायगडकरांनी अनुभवले आहे. भाजप- शिंदे आणि अजित पवार गटाचे सरकार आले आणि जणू रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला दृष्ट लागली. महायुतीच्या सरकारमध्ये अद्यापही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. पालकमंत्रीपदाचे कोडे तटकरे आणि गोगावले या दोन मंत्र्यांच्या डावपेचांमुळे सुटलेले नाही. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान मिळावा यासाठी सरकारदरबारी शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी फिल्डिंग लावल्याचे समजते. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना मिळणार की भरत गोगावलेंना मिळणार, याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहचला होता. आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देऊ नये अशी आग्रही मागणी रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. महाडचे आमदार भरत गोगावले यांना पालकमंत्री पद द्यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली होती. पालकमंत्री पदाचा हा वाद दिल्ली दरबारी देखील पोहोचला आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळणार अशा चर्चांना उधाण आल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या डावपेचामुळे भरत गोगवलेंचे पालकमंत्रीपदाचे स्वप्न भंगले.
रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत विचारणा केली जाते. त्यावेळी वेळ मारून नेण्यापलीकडे राज्याचे हे महत्वाचे नेतृत्व काहीच करीत नाहीत. रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसलातरी विकासासाठी निधीचे नियोजन अधिक आणि योग्य केल्याचे यावेळी सांगितले जाते. परंतु, आता पालकमंत्री पदाचा तंटा ध्वजारोहण करण्यावरून सुरू झाला आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला नक्की ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.







