ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील ढालकाठीनिगडे रोडवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या कमानीवरून वाद निर्माण झाला असून, हा वाद आता अधिक तीव्र झाला आहे. या ठिकाणी कांगोरी गडाची कमान उभारण्यास खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वेळेत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या मार्गावर सुमारे पाच वर्षांपूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारण्याबाबत खरवलीकाळीज ग्रामपंचायतीत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात हा ठराव डावलून दि. 31 डिसेंबर 2025 रोजी संबंधित ठेकेदाराने ढालकाठीनिगडे रस्त्यालगत कांगोरी गड कमानीच्या कामाला सुरुवात केली.
या कामाची माहिती मिळताच खरवली बौद्धवाडी येथील ग्रामस्थ सखाराम राया सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेत काम तात्काळ थांबवले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच कमान होणार असल्याचे त्यांनी ठेकेदारास सांगितले. यावेळी किरकोळ वाद झाला असून अखेर काम बंद करण्यात आले.
दरम्यान, ठेकेदाराकडून “मंत्री भरत गोगावले यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी कांगोरी गडाची कमान उभारण्याचे आदेश आहेत,” असा दावा करण्यात आला. मात्र, ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव असताना तो डावलून वेगळ्या स्वरूपाची कमान उभारली जात असल्याने बौद्ध समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नसून संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावाच्या कमानीसाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या ठिकाणी तात्काळ कांगोरी गड कमानीचे काम कायमस्वरूपी थांबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच कमान उभारावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. जर लवकरात लवकर या मागणीची दखल घेण्यात आली नाही, तर खरवली बौद्धवाडी ग्रामस्थ रस्त्यावर उतरून उपोषणास बसतील, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. या वादाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







