कास पठाराचा भास; पर्यटकांचे आकर्षण
। पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील विविध पठारांवर ऑक्टोबर महिन्यात फिरतांना पिवळी सोनकीची फुले तसेच युट्रीक्युलारीया व कारवीची जांभळी-निळी आकर्षक फुले लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे हे ठिकाण कास पठार असल्याप्रमाणे वाटत आहे. यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी आवर्जून थांबत असतात.
माथेरान, माणगाव, पोलादपूर, म्हसळा, तळा आदी तालुक्यातील रानमाळावर तसेच डोंगरावर ही फुले बहरलेली आहेत. जांभळ्या-निळ्या रंगाची चिटुकली आकर्षक फुले दृष्टीक्षेपात पडताच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, ही वनस्पती शिकारी असून मांसाहारी आहे. याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. युट्रीक्युलारीया हे या वनस्पतीचे शास्त्रीय नाव असून तिला ‘सीतेची आसवे’ म्हणून ओळखले जाते. तर, कारवी ही डोंगर उतारांवर वाढणारी झुडूप वजा बहुपयोगी वनस्पती आहे. जिल्ह्यातील डोंगर व जंगलात सध्या कारविला मोठ्या प्रमाणात एकत्रित बहर आला आहे. जांभळ्या रंगांची आकर्षक टपोरी फुले जंगल व डोंगराची शोभा वाढवत आहेत. यामुळे पर्यटक देखील आकर्षित होत आहेत. ही वनस्पती मातीची धूप रोखण्याचे काम करते. शिवाय हिच्या फांद्यांपासून आदिवासी बांधव आपली घरे तयार करतात. कारवी जैवविविधता व जंगल संवर्धनास हातभार लावते असे असंख्य फायदे या वनस्पतीचे आहेत.
युट्रीक्युलारीया कीटकभक्षी वनस्पती
या हंगामात सह्याद्रीच्या खडकाळ पठारांवर ही वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवते. ती अवघी 7 सेंटीमीटर उंचीची असून अगदी बोटांच्या नखांएवढी लहान मात्र आकर्षक जांभळ्या-निळ्या रंगाची फुल युट्रीक्युलारीया या वनस्पतीला येतात. तसेच, युट्रीक्युलारीयाला कीटकभक्षी वनस्पती म्हटले की, डोळ्यांसमोर चिकट द्रावाचे द्रोण भरलेल्या वनस्पती येतात. पण ही वनस्पती वेगळी आहे. म्हणजे या वनस्पतीच्या खोड व मुळांवर सुक्ष्म छिद्र आणि दाट केस असलेल्या पिशव्या असतात. या पिशव्या म्हणजे तिचे जठरच. या पिशव्यांध्ये अतिसुक्ष्म कीटक अडकतात आणि पचवलेसुद्धा जातात.
कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिचे एकत्रित बहरणे हे आहे. यावेळी सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा असल्यासारखे वाटते. ही झाडे सलग सात वर्षे वाढतात आणि आठव्या वर्षी सर्व झाडे एकाच वेळी फुलतात. जांभळ्या रंगाची टपोर्या फुलांनी ही झाडे बहरतात तेव्हा जंगल व डोंगर उतारांना जणूकाही जांभळ्या रंगांची चादर ओढल्याप्रमाणे वाटते. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच बसतात.
रणजित म्हात्रे,
वनस्पती व निसर्ग अभ्यासक
जिल्ह्यातील जंगलात व डोंगर उतारावर कारवीची फुले मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. विळे ताम्हिणी घाटात हा बहर अधिकच आहे. कारवीचा बहर साधारण दोन-तीन आठवडे टिकतो. ऊन वाढू लागले की फुले करपतात व बहर ओसरू लागतो. फुलांमुळे पर्यटक अधिक आकर्षित होतात. स्थानिक आदिवासी कारवीच्या फांद्यांपासून कुडाची घरे करतात. कारवी पर्यावरण संवर्धनाचे महत्वपूर्ण काम करत आहे. तिचे जतन होणे आवश्यक आहे.
राम मुंडे,
स्थानिक निसर्ग व पर्यावरण अभ्यासक







