| नागोठणे | वार्ताहर |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोठणे विभागातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. नागोठणे विभागातील पिगोंडे, आंबेघर, वेलशेत, कडसुरे व वणी येथील राजिप शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्राची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करुन तेथील सर्व सोयी-सुविधा, इतर व्यवस्था याबाबतीत मतदान केंद्रांचा आढावा घेत संबधितांना आवश्यक त्या सुचना केल्या.
आगामी लोकसभा निवडणुका संपुर्ण जिल्ह्यात शांततेत व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन तसेच भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे संपूर्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांची पाहणी करीत आहेत. याद्वारे जिल्हाधिकारी मतदान केंद्रातील विविध सोयी-सुविधा, पाणीपुरवठा व इतर व्यवस्था चोख आहेत की, नाहीत याचा आढावा घेत आहेत. नागोठणे विभागातील मतदान केंद्रांचा पाहणी दौरा हा त्याचाच एक भाग असून नागोठणे विभागातील या मतदान पाहणी दौ-यात मतदान केंद्रातील सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे शुध्द पाण्याची व्यवस्था व परिसराची स्वच्छता याविषयी समाधान व्यक्त करुन प्रशंसोद्गार काढले.
रोहा येथील उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, रोहाचे तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, नायब तहसीलदार वैशाली काकडे, नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. हरेष काळसेकर, नागोठणे मंडळ अधिकारी भरत गुंड, सहाय्यक फौजदार प्रमोद कदम, हे.कॉ. विनोद पाटील, नागोठणे ग्रामसेवक राकेश टेमघरे, कडसुरे ग्रामसेवक विजय अहिरे, नागोठणे तलाठी गणेश विटेकर, वरवठणे तलाठी दिलिप खंदारे, पाटणसई तलाठी सचिन सांबरी आदींसह महसूल, राजिप व पोलिस खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.