उच्चदाब वाहिन्यांचे मनोरे उभारण्यास स्थगिती
| पेण | प्रतिनिधी |
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जेएसडब्ल्यू कंपनीच्या 400 के.व्ही. भारवाढीसाठी उभारण्यात येणाऱ्या उच्चदाब पारेशन वाहिन्यांचे मनोरे तसेच संबंधित कोणतेही काम पुढे नेऊ नये, असा ठाम आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
220 के.व्ही. नागोठणे एसपीसीएल वाहिनीच्या तारा (कंडक्टर) बदलण्याचे काम तसेच जेएसडब्ल्यू कंपनीला 400 के.व्ही. विद्युत पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित वाहिनीच्या कामादरम्यान मनोऱ्याखाली व वाहिनीखाली बाधित होणाऱ्या जमिनीच्या मोबदला व नुकसानभरपाईबाबत कानसई (ता. रोहा) ते कासरुघुंटवाडी (निगडे, ता. पेण) परिसरातील बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. 8 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथील राजस्व सभागृहात पार पडली.
या बैठकीत उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी महापारेशनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अ.उ.दा. उपकेंद्र प्रकल्प, उपविभाग ठाणे येथील मिथुन रामटेके यांना स्पष्ट शब्दांत आदेश देत सांगितले की, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जेएसडब्ल्यूच्या 400 के.व्ही. उच्चदाब पारेशन वाहिन्यांचे मनोरे उभारू नयेत, तसेच कोणतेही संबंधित काम करू नये. तसेच बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रथम सविस्तर सर्व्हे करून वाहिनीचा ले-आऊट प्रसिद्ध करावा व त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत बाधित शेतकऱ्यांना सविस्तर लेखी नोटीस देण्याचे आदेशही देण्यात आले.
या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीकांत गायकवाड, महापरेशनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिथुन रामटेके, पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी ॲड. मानसी म्हात्रे, किशार म्हात्रे, गणपत म्हात्रे, पांडुरंग म्हात्रे, संतोष म्हात्रे, मधुकर ठाकूर, मिलिंद डाकी, राकेश म्हात्रे, नथुराम पाटील, हर्षल ढमाळ, ॲड. गणेश जाधव, प्रशांत भोईर, दत्ताराम करजेकर, मंगेश जाधव आदींसह कानसई ते वडखळपर्यंतचे शेकडो बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या ठाम भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.







