स्वच्छतेत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे

जि.प. अध्यक्ष योगिता पारधी यांचे आवाहन
अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. जिल्ह्याने गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. नागरिकांनी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आपले मत नोंदवून रायगड जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 पुन्हा एकदा स्वच्छतेच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण 2021 ची घोषणा करण्यात आली असून, जिल्हावासियांना थेट सहभाग घेण्याकरिता मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने 9 सप्टेंबरपासून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचे गुणांकन सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसकरिता 350 गुण, थेट निरीक्षण 300 गुण, नागरिकांचा प्रतिसाद 350 गुण याप्रमाणे होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळविण्यासाठी केंद्र शासनाने ऑनलाईन प्रतिसाद नोंदविण्याकरीता गुगल प्ले स्टोअरमध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 करिता SSG 2021 हे अ‍ॅप्लिकेशन सुरु केले आहे.
अभिप्राय नोंदवा
SSG 2021 हे प्लिकेशन गुगल प्ले स्टोअर डाऊनलोड करुन विचारलेल्या पाच प्रश्‍नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. या प्रश्‍नांमध्ये कुटुंबाकडून शौचालयाचा वापर, घनकचरा व्यवस्थापन पुढाकार व सुरुवात, सांडपाणी व्यवस्थापन पुढाकार व सुरुवात, स्वच्छता सुविधामध्ये सुधारणा, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे काम समाधानकारक या बाबींना जिल्ह्याला गुण मिळणार आहेत. स्वच्छता क्षेत्रात जिल्ह्याचे नाव देशात प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवरुन SSG 2021 हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करुन आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version