पंकज तांबे यांची मागणी
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथे होणार्या कोकण विभागीय क्रीडा संकुलाला माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माता रमाई यांच्या जयंतीदिनी दि.7 फेब्रुवारी रोजी प्रसार माध्यमांजवळ बोलताना बौद्ध धम्म समिती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे यांनी केली आहे. माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पंकज तांबे यांनी त्यांच्या बौद्ध धम्म समिती कार्यालय माणगाव याठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत समितीचे उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के व संभाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
दक्षिण रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असून दिवसेंदिवस माणगावचे महत्व वाढत आहे. माणगाव याठिकाणी सर्व सोयीयुक्त प्रशस्त जागेत सुमारे 10 हेक्टर जागेवर कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारले जाणार असून हे क्रीडा संकुल ज्या ठिकाणी होणार आहे त्याठिकाणच्या जागेची पाहणी क्रीडा राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 3 फेब्रु. 2020 रोजी केली होती. या पाहणीला तब्बल दोन वर्ष लोटले मात्र अद्यापही या जागेवर शासनांनी कोकण विभागीय क्रिडा संकुल उभारणीचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे कोकण विभागातील तरुण खेळाडूपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असून हे संकुल दोन वर्षानंतरही कागदावरच राहिले आहे. माणगावातील 45 कोटीच्या भव्य क्रीडांगणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विभागीय क्रीडा संकुल उभारणीचे पुढचे पाऊल कधी ? यासाठी बौद्ध धम्म सामाजिक संस्था तसेच स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक पंकज तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य. पालकमंत्री तथा क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून कोकणातील माणगावात होणार्या या कोकण विभागीय क्रीडा संकुलाला माता रमाई आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी पंकज तांबे यांनी केली आहे.