अनेक अनकॅप्ड खेळाडू ‘करोडपती’
किशनवर सर्वाधिक बोली, चहर दुसर्या, तर श्रेयस तिसर्या क्रमांकावर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पहिला दिवस जोरदार होता आणि सर्व 10 फ्रँचायझींनी अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. इशान किशन 15.25 कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. इतर संघांनी दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि आवेश खान या युवा भारतीय खेळाडूंमध्येही रस दाखवला. अवेश खान 10 कोटींच्या बोलीसह सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
आयपीएलच्या महालिलावात शनिवारी 20 कोटी रुपयांच्या महाबोलीची अपेक्षा फोल ठरली. परंतु झारखंडचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन हा लिलावातील सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला. 15 कोटी, 25 लाख रुपये रकमेला मुंबई इंडियन्स संघात त्याला स्थान दिले. अष्टपैलू दीपक चहर (14 कोटी) आणि धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर (12.25 कोटी) यांनी महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना संघात घेतले. सकाळच्या पहिल्या सत्रावर श्रेयसने लक्ष वेधले. मात्र लिलावाच्या दुसर्या सत्रात इशानला संघात कायम राखण्यासाठी मुंबईने सनरायजर्स हैदराबादशी कडवी लढत देत आकडा 15 कोटींपार उंचावला.आकडयात चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंवर 10 कोटी, 75 लाख रुपयांची बोली लागली.
‘राजस्थान रॉयल्सने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी 5 कोटी रुपये मोजले, तर डावखुर्या देवदत्त पडिक्कलला 7 कोटी, 75 लाख रुपये बोलीसह प्राप्त केले. भारताच्या अनुभवी खेळाडूंपैकी सलामीवीर शिखर धवनसाठी पंजाब किंग्जने 8.25 कोटी, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी गुजरात टायटन्सने 6.25 कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी) आणि रॉबिन उथप्पा (2 कोटी) या खेळाडूंना कायम राखले.
परदेशी खेळाडूंपैकी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरला लखनऊ सुपरजायंट्सने 8.75 कोटी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला पंजाब किंग्जने 9.25 कोटी, तर स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने 8.5 कोटींपर्यंत बोली उंचावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सलामीवीर आणि कर्णधारपद हे दोन्ही प्रश्न सोडवण्याच्या इराद्यााने फॅफ डयूप्लेसिसला 7 कोटी रुपयांना संघात स्थान दिले, तर क्विंटन डीकॉकला (6.75 कोटी) लखनऊने स्थान दिले.