। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हारे गावातील नैसर्गिक पाणी वाहून नेणारा नाला शेतकर्याने बंद करून ठेवला होता. मात्र, जोरदार पाऊस झाल्याने नाला बंद केल्याने परिसरातील सर्व शेतीमध्ये पाणीच पाणी साचले आणि स्थानिकांच्या घरात पाणी जाण्याची शकयता निर्माण झाली होती.
कोल्हारे गावातील स्थानिक शेतकर्यांच्या रस्त्याचा प्रश्न असल्याने त्यांनी नाल्याचा भाग आपल्या शेतीत असल्याने बंद करून ठेवला होता. गेली दोन महिने तो नाला बंद करून ठेवला होता, त्या काळात संबंधित यंत्रणा यांच्याकडून शेतकर्यांच्या प्रश्नावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नाला बंद करण्याचा विषय तसाच होता. मात्र, पावसाळा सुरु झाल्याने शेतकर्यांनी बंद केलेल्या नाल्यातून नैसर्गिक पाणी वाहून नेण्याची वाट बंद झाली आणि त्यामुळे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसले. काही पाणी ग्रामस्थांच्या पायरीपर्यंत पोहोचल्याने महसूल विभागाला त्याबाबत तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. त्यावर नेरळ येथील मंडळ अधिकारी संतोष जांभळे हे घटनास्थळी पोहोचले. तेथील परिस्थिती पाहून नाला पुन्हा खुला करण्यासाठी जेसीबी मशीन मागवून घेण्यात आल्या आणि त्यानंतर नाला खुला करून नैसर्गिक पाण्याला वाट करून दिली. नेरळ मंडळ अधिकारी संतोष जांभळे व कोल्हारे तलाठी उमेशकुमार भोरे यांनी तात्काळ दखल घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन नाला मोकळा करून दिला.







