विरार-अलिबाग महामार्ग रखडल्याचा परिणाम
| चिरनेर | प्रतिनिधी |
राज्य सरकारकडील आर्थिक टंचाईमुळे विरार-अलिबाग बहुद्देशीय महामार्ग रखडल्याने जेएनपीए ते दिल्ली हे अंतर आठ तासांत पार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी महामार्गाचे स्वप्न अधुरे राहण्याच्या मार्गावर आहे. त्याऐवजी बडोदा-मुंबई महामार्गातील ‘मिसिंग लिंक’ तयार करण्यासाठी नवा पर्याय शोधण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केला आहे. आयसीटी कंपनीला याबाबतचा तपशीलवार प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सोपवले असून, ऑगस्टअखेरपर्यंत ही कंपनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर त्याबाबतचा अहवाल मांडणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतून ‘मुंबई-दिल्ली महामार्ग’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या मार्गाच्या माध्यमातून जेएनपीए बंदरातून थेट दिल्लीपर्यंत अवघ्या आठ तासांत पोहोचणे शक्य होणार होते. या महामार्गाचा एक भाग असलेल्या बडोदा-मुंबई महामार्गाचे काम पनवेल तालुक्यातील मोरबे गावापर्यंत अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षापासून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याच्या तयारीत असला तरी या महामार्गाला जेएनपीए बंदराशी जोडण्यासाठी आवश्यक असणारा विरार-अलिबाग बहुद्देशीय महामार्ग रखडल्यामुळे संपूर्ण मार्गाची सुसंगतता विस्कळीत झाली आहे.
महाराष्ट्र सरकारकडे भूसंपादन बांधकामासाठी निधीची कमतरता असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. पुढील काही महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार असल्याने शहरातील शीव-पनवेल, कळंबोली-मुंब्रा-पनवेल, कल्याण-तळोजा या महामार्गांवरील वाहतूक कोंडी दूर करण्याची संधीही गमावली आहे. या रखडलेल्या अवस्थेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोरबे ते कळंबोलीपर्यंत ‘मिसिंग लिक’चा नव्याने प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
2016 साली या रस्त्याची आखणी होत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मोरबे ते कोन या मार्गिकेसाठी दोन वेगवेगळ्या प्राधिकरणांनी काम करण्यापेक्षा एकाच प्राधिकरणाने ही जबाबदारी उचलण्याचे ठरले. 2025 अखेरपर्यंत हे दोन्ही महामार्ग वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन होते. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारचा अतिरिक्त खर्च झाल्याने हा प्रकल्प रखडला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बडोदा-मुंबई हा राज्यातील 153 किलोमीटरचा महामार्ग वापरात येण्यासाठी या हालचालींना वेग आला आहे.
असा असेल नवा मिसिंग लिंक मार्ग
सध्या आयसीटी कंपनीकडून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. नवा मिसिंग लिंक यामार्गे हा महामार्ग पनवेल तालुक्यातील मोरबे, महाळुंगी, कानपोली, पाले बुद्रुक, वळवली, टेंभोडेमार्गे कळंबोली सर्कल येथील आठपदरी महामार्गाला जोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. वाहतुकीला जलद व सुलभ मार्ग देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प पनवेलच्या भविष्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दिल्ली-मुंबई, बडोदा-मुंबई हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधत आहे. तर, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका राज्य सरकार बांधत आहे.






