कोकणच्या महामार्गाचे स्वप्न अपूर्णच

14 वर्षानंतरही कामाची गती मंद

। माणगाव । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 14 वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरू असुन हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्‍नच आहे. रखडलेल्या महामार्गाच्या कामाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आजही अपूर्णच राहिले आहे.

राज्यातील महत्वाचा विदर्भातील समृद्धी महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण झाले. मात्र, कोकणच्या विकासाचा मुंबई-गोवा महामार्ग वर्षोनुवर्षे रखडला असल्याने कोकणवासीयांचे दुखणे कायम राहिले आहे. सरकारने अनेक वेळा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासनाने दिली होती. त्यामुळे आजही कोकणच्या समृद्धीचा मार्ग खडतरच राहिला. या मार्गावरील इंदापूर व माणगाव बायपास कामाचा ठेकेदार बदलला तरी कामाला गती नाही. तसेच लोणेरे, टेमपाले, लाखपाले दरम्यान रस्त्याचे काम ठीकठिकाणी अपूर्ण असल्याने प्रवाशांची नाराजी पसरली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे लहान-मोठे अपघात तसेच या अपघातांतून अनेकांचे जाणारे जीव व अनेकांना आलेले कायमचे अपंगत्व पाहता हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळाच बनला होता. गेल्या 14 वर्षांपूर्वी पळस्पे ते इंदापूर या जवळपास 90 किलो मीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर इंदापूरपासून पुढे दुसर्‍या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या महामार्गाचे काम गेली 14 वर्ष रखडले असुन पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे कामही अजून व्यवस्थित पूर्ण झालेले नाही. इंदापूरपासून पुढे असणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील माणगावचा बायपासचा प्रश्‍नही खितपत पडला आहे. बायपासच्या कामाची रखडपट्टी यामुळे माणगाव शहरात सातत्याने वाहनांच्या 10 किमी पर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. माणगाव शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बाजारपेठेतून बाहेर पडताना त्यांच्या नाकी दम येत आहे. मुंबई गोवा महामार्गानंतर समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन तो महामार्ग पूर्ण होवून सुरु झाला आहे. मग 14 वर्ष उलटूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजून पूर्ण का होत नाही असा सवाल जनतेतून होत आहे.

माणगाव व इंदापूर येथील बायपास कामातील वन व रेल्वे विभागाकडील मंजुरीच्या अडचणी दूर झाल्या असून या कामाचा पहिला ठेकेदार बदलला असून दुसर्‍या ठेकेदारांकडून हे काम करून घेतले जात आहे. लोणेरे ते टेमपाले, लाखपाले दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर इतर कामेही लवकर पूर्ण केली जाणार आहेत.

आकांक्षा मेश्राम,
मुंबई-गोवा महामार्ग सहाय्यक अभियंता
Exit mobile version