। अलिबाग । भारत रांजणकर ।
अलिबागमध्ये चौघांना धडक देऊन पळणार्या कार चालकाचा पाठलाग करुन बहाद्दर तरुणांनी पकडले. वायशेतजवळ कार चालकास पकडण्यात पोलिसांना यश आले. आकाश राजेश बीचकर (वय 27) असे त्या चालकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत अविनाश शिवलिंग सुर्यवंशी, सचिन रुपेश डुबकर व दोन मुली या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण पिंपरी चिंचवड, पुणे येथील रहिवासी आहेत.
यावेळी मयुरेश कावजी व संकल्प गव्हाणे यांनी जीवाची पर्वा न करता कारचा पाठलाग करीत वायशेतजवळ त्यांना अडविले. त्यावेळी कार चालकाने दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन तरुणांनी कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे सर्व स्तरातून या दोन तरुणांचे कौतुक होत आहे.
भरधाव कार चालकाने अलिबाग शहरातील हॉटेल फुलोराजवळ दोन महिलांना धडक दिली होती. नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो न थांबता कार घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. पळून जाताना त्याने आणखी एका एका मोटार सायकललादेखील ठोकर मारली. तसेच घरत आळी येथेही एकाला ठोकर मारुन त्याने पलायन केले होते. मात्र बहाद्दर तरुणांनी वायशेत येथे पकडून कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले.