आमचे दाराशी हाय शिमगा…

जिल्हाभर घुमणार होळीचा ढोल; रंगोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या

शिमगा अथवा होळी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण मानला जातो. होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाने मारली बंदुकीची गोळी…. अशी हाळी देत उद्या जिल्हाभर शिमग्याच्या ढोलाचा आवाज घुमणार आहे. दरम्यान, होळीनिमित्त विविध रंग आणि पिचकार्‍यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच झेंडूची फुले, बत्तासांच्या माळा आदी विविध पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. जिल्हाभर हा सण आनंद, उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.

या रं पालखीत कोण देव बसं !

| माणगाव | प्रतिनिधी |
रायगडात शिमगोत्सवाला अतिशय महत्व आहे. आली रे आली होळी आली असं म्हणत सर्वत्र होळीचे स्वागत केले जाते. माघ महिना संपल्यावर ऋतूंचा राजा वसंताचे आगमन होते. सार्‍या रानाला फळा, फुलांचा बहर येतो. आंबे, काजू, फणस, करवंदे आणि इतर अनेक रानफळे बहरास येत असतात. अशा वेळेस सर्वांना वेध लागतात ते फाल्गुन पौर्णिमेचे अर्थात होळी पौर्णिमेचे. रायगड आणि संपूर्ण कोकणात होळी सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. लहान थोर महिला पुरूष अबालवृद्ध सारेच जण या आनंदोत्सवात सहभागी होतात. रानावनात बहर देणारा निसर्ग एका प्रकारे आनंदाने गावागावात येतो आणि सारे गाव या उत्साहात न्हाऊन निघते.


होळी पौर्णिमेच्या दिवशी सारा गाव एकत्र येऊन मोठी होळी रचतात. यामध्ये घराघरातून लाकूड, फाटा, गवत, पेंडा उपयोगात नसलेल्या वस्तू, बांबू इत्यादी जमा केले जाते. पारंपारिक ठिकाणी या जमा केलेल्या साहित्यातून मोठी होळी तयार करतात. यात सर्व गाव सहभागी होते. रात्रीच्या शुभ मुहूर्तावर घोपी होळीचे फाग म्हणतो. सारे गाव होळीभोवती फेर धरत फाग म्हणतात. ’या रं पालखीत कोण देव बसं’ हे गाणं आणि तेहतीस कोटी देवांना बोलावून झाल्यानंतर सुवासिनी होळीची पूजा करतात. गावपांढरीला बोलावून घोपी होळी पेटवितात. या पेटत्या जाळा भोवताली अनेकजण फेर धरतात. पेटत्या होळीत नारळ टाकण्याची प्रथाही सर्वत्र रूढ आहे. याबरोबरीने पेटत्या होळीतून नारळ काढण्याचा खेळ खेळला जातो. दहकणार्‍या अग्नित हात घालून नारळ काढण्याचा हा खेळ मर्दानी आहे. अनेकजण या खेळात सहभागी होतात. अर्धवट जळणारे हे नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. होळीनंतर साजरी होणारी धूळवड, रंगपंचमी सार्‍या गावातून आनंदाची उधळण असते. मुंबईतील चाकरमानी खास या दिवसात गावी येतात. अनेक गावातून या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम होतात. विविध स्पर्धा होतात. गावातील समस्या सोडविण्यासाठी गाव बैठका होतात. विकासावर चर्चा होतात. भरपूर गप्पाटप्प्यांचा असा हा सण मानला जातो.

नवविचारांचा सृजनाचा सण
अमंगल बोलून मनातील अढी भिडास्त याच दिवसात बोलली जाते. कोणी कोणाचा राग धरत नाही. वाईट टाकून देण्याचा हा सण नवीन विचार देतो. गावागावतील नवविचारांचा सृजनाचा हा सण रायगड आणि सार्‍या कोकणाचे वैशिष्टय आहे. निसर्गासोबत आनंद घेण्याचा आणि देण्याचा हा सण संस्कृती लोककला आणि मानवी मूल्य अधिक दृढ करण्याचा आहे.

शिमगा हा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणासाठी सर्वजण गावी येतात. यानिमित्ताने गाठीभेटी होतात. नृत्य गाण्याचा आनंद मिळतो.

कल्पेश पोटले, होळीप्रेमी

होळीची जय्यत तयारी

| पाताळगंगा | वार्ताहर |
मोहपाडा, खोपोली, चौक अशा विविध बाजरपेठा होळीच्या आगमनासाठी सजल्या असून, बाजारपेठत विविध प्रकारच्या पिचकारी, रंग, विविध प्रकारचे मुखवटे अशा विविध वस्तूची ग्राहाकांना भुरळ घातली जात आहे. होळी, धूलिवंदन, रंगपंचमी हा सण म्हणजे ’बुरा न मानो होली है’ म्हणत खेळला जाणारा आबालवृध्दांचा सण आहे. या निमित्ताने आपआपासातील वैर विसरून अनेकजण एकत्रित येऊन हा सण साजरा करण्याची जणू भारतीय परंपरा आहे. सध्या बाजारपेठेत होळीच्या नैवेद्याचे पापड, फेण्या, कुरडया तसेच रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंगाच्या सोबतीला चिनी पिचकार्‍या बाजारात दाखल झाल्या असून, बच्चे कंपनीकडून त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

चिरनेरमधील आठवणीतील होलिकोत्सव

| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर पंचक्रोशीत हा होलिकोत्सव जोरदारपणे साजरा केला जातो. होळीचे आजचे स्वरूप बदलले असले तरी येथील काही जुन्या परंपरा अजून कायम टिकून आहेत. चिरनेर परिसरात प्रत्येक गावागावात, वाडीवस्तीत होळीचा सण साजरा केला जातो. शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत हा होळीचा उत्सव साजरा केला जातो. यात शुद्ध नवमीला होळीचे मुख्य पुजारी सावर जातीच्या झाडाची एक लहान फांदी आणून ती होळीच्या खांबावर म्हणजे होळीच्या मैदानात संध्याकाळी उभी करून त्या फांदीची हळद कुंकुनी पूजा करून त्यावर पेंढा टाकून बोंबा मारून फांदी पेटवून देण्याची प्रथा होती. पण, ही प्रथा आज दिसून येत नाही. शुद्ध नवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत दर दिवस संध्याकाळी हा उपक्रम केला जात होता. आज हा उपक्रम दिसून येत नाही.


दुसर्‍या दिवशी होळीवर तापलेल्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा अजूनही चिरनेर गावात आहे. दरम्यान, पुरणपोळी व तत्सम गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा मात्र सर्वत्र कायम आहे. होळी धुळवड रंगपंचमीच्या निमित्ताने सप्तरंगांची उधळण होताना येथे पाहायला मिळते. वर्तमानानुसार होळीकोत्सवात रुढी परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. हे मात्र तितकेच खरे आहे.

शिमगोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील शिमगोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. शहरातील जोगवाडी येथे आजही पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. नोकरी व कामानिमित्त शहराकडे स्थलांतरित झालेले जोगवाडीतील तरुण पिढी, नागरिक तसेच माहेरवाशीणी आवर्जून शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परततात.


शहराची ग्रामदेवता श्री चंडिका देवीचे मूळ स्थान तळेगावच्या कोंडीवर असल्यामुळे तळेगावचा शंखासुर जोगवाडीच्या शंकासुराच्या भेटीस होळीच्या एक दिवस आधी येतो. दोन्ही शंखासुरांमध्ये सलामीचा कार्यक्रम पार पडतो. ही सलामी पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. जोगवाडी येथील होळी लावण्याचा मान हा देशमुख आणि गावचे पोलिस पाटील यांना देण्यात आलेला आहे. जोगवाडीतील माहेरवाशीणी देवी माहेरी आल्याने विविध कार्यक्रम आयोजित करतात.ज्यामध्ये सुवासिनींचा कार्यक्रम, हळदीकुंकू, सत्यनारायणाची महापूजा यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो. होळी लागल्यानंतर रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास देवीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होते. ही पालखी पानसरे होळी, परिटांची होळी, कुंभार वाडीतील होळी,गवळ्यांची होळी तसेच पुढे सोनार आळीतील होळीला भेट देऊन पहाटे चारच्या दरम्यान पुन्हा जोगवाडीत दाखल होते. रंगपंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करून मग पाच दिवस माहेरी आलेल्या ग्रामदेवता चंडिका देवीची पाठवणी केल्यानंतर शिमग्याची सांगता होते.

होळी सणाला आधुनिकतेची साथ

। गडब । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी विशेषतहा नाचगाण्याचा कार्यक्रम आसल्याने यावेळी डीजेचा वापर केला जात असून, पारंपरिक वाद्यांबरोबर डीजेच्या बरोबर लेझर लाईट आधुनिकतेची साथ होळी उत्सवाला मिळत आहे.


दरम्यान, होळी गावात नाचतगाजत गुळाळ उधळत आणली जाते. होळीची सजावट करुन होळी उभी केली जाते. परिसराची सजावट व रोषणाई केली. होळीच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करुन होळीची पूजा करतात व रात्री 12 वाजता होळीचा होम रचून होळी लावली जाते.

होड्यांनी वेधलं लक्ष

| आगरदांडा | प्रतिनिधी |
वर्षभर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणारे कोळीबांधव हे व्यवसायानिमित्त कुटुंबापासून अनेक दिवस दूर राहतात. पण, होळीच्या या उत्सवानिमित्त मच्छिमार बांधव हे आपल्या होड्या घेऊन घरी परततात. यानिमित्ताने कुणी होड्यांना रंगीबेरंगी पताकांचे तोरण लावून सजवतात, तर कोणी फुलांच्या माळा लावतात. या होड्या नागरिकांसह पर्यटकांचे आकर्षण ठरत असून, त्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.


होळीच्या या सणानिमित्त हे मच्छिमार बांधव बोटीमध्ये गाण्याच्या तालावर नाच करीत एकमेकांना रंग लावीत आपला आनंद साजरा करतात. या निमित्ताने मुरुड शहरातील व पंचक्रोशीतील कोळी बांधव होड्यांची पूजा करुन कोळी गाण्याच्या तालावर नाच करीत एकमेकांना रंग लावीत उत्सव साजरा करतात.

Exit mobile version