डंपर चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात

ट्रेलर चालकास 12 किलोमीटर नेले फरफटत

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेलजवळील जेडब्ल्यूआर कंपनीजवळील निलेश ढाबा परिसरात एक डंपर दुसर्‍या ट्रेलरच्या केबिनला घासला. सदर डंपर थांबविण्यास सांगितले असता तो न थांबविता ट्रेलर चालकास फरफटत नेत त्याला खाली पाडून सदर डंपर चालक डंपरसह पसार झाला. तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डंपर चालकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रवीण येळे (26) हे कळंबोली येथे असताना आरोपी डंपर चालक राकेश चौधरी (26) याच्या ताब्यातील डंपरने प्रवीण येळे यांच्या ट्रेलरच्या केबिनला घासल्याने प्रवीण येळे यांनी राकेश चौधरी यास थांबण्यास सांगितले असता तो न थांबल्याने त्याचा पाठलाग करून प्रवीण येळे यांनी राकेश चौधरी याला उतरण्यासाठी तो डंपरच्या बोनेटवर चढला असताना राकेश चौधरी याने सदर डंपर न थांबविता जेएनपीटीच्या विरुद्ध दिशेने घेवून जावू लागला. यावेळी प्रवीण येळे हे डंपरच्या बोनेटवर धोकादायक परिस्थितीत लटकले होते. त्या स्थितीत त्याला 12 किलोमीटर घेवून गेले.

पुढे कुंडेवहाळ परिसरामध्ये असलेल्या खदानीकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावरुन प्रवीण येळे हे चालत्या बोनेटवरुन खाली पडले व त्यात ते गंभीर जखमी झाले. अशा परिस्थितीत सुद्धा राकेश चौधरी त्यांना तसेच तेथे टाकून तो डंपरसह पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उद्धव साळुंखे यांनी परिसरातील तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपीला नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version