आयुक्त कार्यालयाचा इगो आडवा आला?

शिक्षणाधिकाऱ्यांनी ठणकावले

| रायगड | प्रतिनिधी |

दोनच दिवसांपूर्वी कोकण आयुक्त कार्यालयाने रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. सदरच्या बैठकीमध्ये शिक्षण विभागाच्या योजनेबाबत माहिती मागवली. मात्र, शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार सदरची फाईल तपासता येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यावर आयुक्त कार्यालयाला तुम्ही कसे चॅलेंज करु शकता, असे अधिकाऱ्यांनी विचारताच शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी सदरचे पत्रच वाचून दाखवल्याने संबंधित अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासकीय व्यवस्थेमध्ये दोन स्वतंत्र विभाग असल्याने आदेश कोणाचे घ्यायचे अशा द्विधा मनःस्थितीत शिक्षण विभाग होता. परंतु, आपल्या वरिष्ठांचेच आदेश मानने हे शिक्षण विभागाचे काम आहे. ते त्यांनी निभावले, परंतु आढावा घेण्यासाठी आलेल्यांचा इगो आडवा आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा कोकण आयुक्तांमार्फत घेतला जातो. त्यानुसार 5 जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजाची झाडाझडती सुरू झाली. विशेष म्हणजे, या बैठकीला कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तर चक्क दांडी मारली होती. त्यामुळे गिरीश भालेराव उपायुक्त (आस्थापना) आणि डी.व्हाय. जाधव उपायुक्त (विकास) यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. एकूण 14 विभाग आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाचा आढावा सुरु झाला. त्यावेळी सर्व शिक्षा अभियानांर्तगत येणारे मोफत गणवेश, पाठ्य पुस्तके यासह अन्य बाबींवर चर्चा सुरु झाली. त्यावेळी संबंधित फाईल आपल्याला देता येणार नाही. आमच्या वरिष्ठ कार्यालयाचे तसे निर्देश आहेत, असे शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी सडेतोडपणे सांगितले.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद हे स्वतंत्र कार्यालय आहे. त्यासाठी प्रकल्प संचालक हा आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्यानुसार त्यांनी पत्र निर्गमीत केले आहे. मात्र, तुम्ही आम्हाला कसे चॅलेंज करता अशी विचारणा उपायुक्तांनी केली. त्यानंतर गुरव यांनी प्रकल्प संचालकांचे याबाबत आलेले पत्रच उपायुक्तांना वाचून दाखवले. या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सभागृहातील वातावरण तणावाचे झाले होते. गुरव यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. माझ्या वरिष्ठांकडून आलेले पत्र मी संबंधित अधिकाऱ्यांना वाचून दाखवले, तसेच नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे अवगत करुन दिले. त्यानंतर त्यांना माझे म्हणणे पटले, असे शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपायुक्त गिरीश भालेराव यांच्याशी या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

माझ्या वरिष्ठांकडून आलेले पत्र मी संबंधित अधिकाऱ्यांना वाचून दाखवले, तसेच नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे अवगत करुन दिले. त्यानंतर त्यांना माझे म्हणणे पटले.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी
Exit mobile version